नवी दिल्ली - लोकेशन शोधण्यासाठी गुगल मॅप्सचा वापर केला जातो. स्मार्टफोन युजर्समध्ये GPS अत्यंत लोकप्रिय आहे. भारतीय अंतराळ संघटनेने (इस्रो) GPS चं इंडियन व्हर्जन विकसित केलं असून नेव्हिगेशन विद इंडियन कॉन्सटेलेशन (NavIC) असं नाव देण्यात आलं आहे.
GPS ही एकच सॅटलाइट नेव्हिगेशन सिस्टम नाही आहे. तर इतरही नेव्हिगेशन सिस्टम उपलब्ध आहेत. 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान अमेरिकेने भारताला पाकिस्तान सैन्याशी संबंधित GPS डेटा देण्यास नकार दिला होता. त्यावेळी पहिल्यांदा भारताला सॅटलाइट नेव्हिगेशन सिस्टमची गरज भासली होती. त्यानंतर आता भारतातील स्मार्टफोनमध्ये NavIC इंटीग्रेट करण्याबाबत चर्चा सुरू आहे.
इंडियन नेव्हिगेशन सॅटलाइट सिस्टम (IRNSS) लाँचसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये NavIC सॅटलाइट नेव्हिगेशन सिस्टम लाँच केली होती. हे स्मार्टफोनमध्ये इंटीग्रेट करण्यासाठी इस्रो क्वालकॉम आणि ब्रॉडकॉमशी चर्चा करत आहे. NavIC सपोर्टसाठी स्मार्टफोनमध्ये एका नव्या चिपची आवश्यकता आहे आणि चिपमेकर हे काम करू शकतात. सर्वात मोठ्या स्मार्टफोन मार्केट्समध्ये भारताचा देखील समावेश आहे. त्यामुळे डिव्हाईसमध्ये NavIC सपोर्ट हे गेमचेंजर ठरू शकतं.
NavIC नेव्हिगेशन सिस्टम ही केवळ भारत फोकस करते. GPS च्या तुलनेत हे जास्त माहिती देणार आहे. याच्या माध्यमातून 5 मीटरपर्यंत पोजीशन अॅक्युरसी मिळणार असल्याचं इस्रोने म्हटलं आहे. GPS हे L बँडवर काम करतं तर NavIC ड्यूल फ्रीक्वेंसी पावर्ड आहे. ते S आणि L या दोन्ही बँडच्या मदतीने काम करत असल्याने अधिक माहिती देतं.
NavIC साठी एकूण 8 इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटलाइट्स (IRNS) काम करत आहेत आणि सातत्याने लोकेशनशी संबंधित माहिती गोळा करत आहेत. GPS प्रमाणेच NavIC नेव्हिगेशन सिस्टम ड्रायव्हर्सना व्हॉईस इन्स्ट्रक्शन देणार आहे. इस्रोसाठी मल्टीचिप मॉड्यूल (MCM) विकसित झाल्यानंतर 30 पेक्षा जास्त कंपन्या भारतात वाहनांसाठी NavIC ट्रॅकर्स तयार करत आहेत. भारतीय हवाई दलाचे फाइटर जेट्सदेखील नेव्हिगेशनसंबधित माहिती जाणून घेण्यासाठी NavIC ची मदत घेणार आहेत.