मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे. मात्र ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेदरम्यान अनेकदा केंद्रभूत पद्धतीने प्रक्रिया राबविताना महाविद्यालयांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. याचा फटका विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन प्रवेशांना बसतो. या पार्श्वभूमीवर अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या ६ विभागांमध्ये विभागीय सुसंवाद कार्यक्रम (रिजनल इंटरॅक्शन प्रोग्राम) आयोजित करण्याचा निर्णय सीईटी सेल आणि प्रवेश नियामक प्राधिकरणाने घेतला.
२०१६ पासून सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच्या केंद्रीय आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत सीईटी प्रवेशप्रक्रिया उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर गुणवत्तेनुसार त्याची संबंधित महाविद्यालयात प्रवेशासाठी निवड केली जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे तपासून त्याच्या प्रवेश निश्चितीची जबाबदारी ही महाविद्यालयांची असते. मात्र अनेकदा अनेक महाविद्यालयांना या स्तरावर तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते किंवा मग प्रवेश प्रक्रियेशी संबंधित कर्मचाऱ्याला पुरेसे ज्ञान नसल्याने प्रवेश प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडली जात नाही.
अनेक दुर्गम व ग्रामीण भागातील महाविद्यालयांना अनेकदा मुंबईत असणाºया सीईटी सेल कक्षाशी संपर्क साधणे अशक्य होते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेशांवर होऊन त्यांचे प्रवेश मुदतीत होऊ न शकल्याने शैक्षणिक नुकसान होते.या कार्यक्रमाद्वारे त्या-त्या विभागातील महाविद्यालयांना प्रक्रियेदरम्यान येणाºया तांत्रिक अडचणी कशा सोडविल्या जाऊ शकतात, प्रक्रियेचे संपूर्ण ज्ञान कसे दिले जाणार आहे.
येथे राबवणार विभागीय सुसंवाद कार्यक्रम
महाराष्ट्र राज्यातील अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या विभागांमध्ये कला संचालनालयाची १० महाविद्यालये, संचालनालयाची १८६ महाविद्यालये, उच्च शिक्षण संचालनालयाची ९५१ महाविद्यालये, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाची ३१३ महाविद्यालये, मत्स्य व दुग्ध शिक्षण संचालनालयाची ४ महाविद्यालये, कृषी शिक्षण विभागाची १७७ महाविद्यालये, तंत्रशिक्षण संचालनालयाची २,११४ महाविद्यालये अशी एकूण ३,७५५ महाविद्यालये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात. त्यामुळे या सर्व महाविद्यालयांना या कार्यक्रमाचा उपयोग होणार असून विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रिया सोपी होऊ शकेल.