आयव्हुमी कंपनीने फिटमी या नावाने नवीन फिटनेस ट्रॅकर बाजारपेठेत सादर केला असून यामध्ये प्रदूषण मापक इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे. आयव्हुमी कंपनीने अलीकडच्या काळात अत्यंत किफायतशीर दरात उत्तमोत्तम स्मार्टफोन सादर केले आहेत. आता या कंपनीने फिटमी या नावाने फिटनेस ट्रॅकर बाजारपेठेत लाँच केला आहे. याचे मूल्य १९९० रूपये असून हे मॉडेल ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. फिटमी मॉडेलमध्ये अन्य फिटनेस ट्रॅकरचे सर्व फिचर्स असून याच्या जोडीला यामध्ये प्रदूषण मापकदेखील देण्यात आलेले आहे. एयर क्वॉलिटी इंडेक्स या नावाने ही पॉल्युशन मॉनिटर प्रणाली यात दिलेली आहे. याच्या मदतीने युजरच्या भोवती असणार्या हवेत नेमके किती प्रदूषण आहे याची माहिती देण्याची सुविधा असेल. जर प्रदूषणाचे प्रमाण जास्त असेल तर काय काळजी घ्यावी? याची माहितीदेखील हा फिटनेस ट्रॅकर युजरला देणार आहे. याच्या जोडीला देशातल्या प्रमुख शहरांमधील प्रदूषणाचे प्रमाण आणि हवामानाचा अंदाजदेखील युजरला मिळणार आहे. हे फिचर या फिटनेस ट्रॅकरची खासियत मानले जात आहे.
अन्य फिचर्सचा विचार केला असता, यामध्ये अन्य फिटनेस ट्रॅकरप्रमाणे हार्ट रेट मॉनिटर, स्लीप मॉनिटर, लाँग सीटींग अलर्ट, रनींग मोड, व्हायब्रेशन इंडिकेटर व पेडोमीटर आदी फिचर्स दिलेले आहेत. हा फिटनेस ट्रॅकर वॉटरप्रूफ आणि स्क्रॅचप्रूफ असल्याने अगदी कशाही पध्दतीने वापरता येणार आहे. फिटमी हेल्थ अॅपच्या मदतीने हा ट्रॅकर युजर आपल्या स्मार्टफोनला कनेक्ट करू शकतो. हे मॉडेल स्मार्टमी ओएस २.० या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारे असून यात ९० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी दीर्घ काळ बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
पाहा :- आयव्हुमीच्या फिटमी फिटनेस ट्रॅकरची प्राथमिक माहिती देणारा व्हिडीओ.