आयुव्हुमी कंपनीने इनेलो या नवीन ब्रँडची घोषणा केली असून याच्या अंतर्गत लवकरच स्मार्टफोनसह अन्य उपकरणे बाजारपेठेत सादर करण्यात येणार आहेत. सध्या बहुतांश कंपन्या एकाच ब्रँडने उत्पादने सादर करण्याऐवजी अन्य ब्रँडनेमचा आधार घेत असल्याचे दिसून आले आहे. काही उदाहरणे द्यायची झाल्यास शाओमीचा पोको, ओप्पोचा रिअलमी, मायक्रोमॅक्सचा यू, हुआवेचा ऑनर आदी विविध ब्रँड बाजारपेठेत लोकप्रिय झालेले आहेत. या माध्यमातून विविध प्रॉडक्ट सादर करण्यात आलेले आहेत. यात आता आयव्हुमी कंपनीची भर पडली आहे. आज या कंपनीने इनेलो हा नवीन ब्रँड सादर केला आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे.
याच्या अंतर्गत विविध प्रॉडक्ट सादर करण्यात येणार आहेत. यात अर्थातच स्मार्टफोनचा समावेश असणार आहे. यासोबत स्मार्टफोन्सशी संबंधीत विविध अॅसेसरीजदेखील बाजारपेठेत सादर करण्यात येणार आहेत. आयव्हुमी कंपनीने आधीच देशभरात आपले जाळे मजबूत केले आहे. यात ५०० पेक्षा जास्त सर्व्हीस स्टेशन्ससह अन्य सुविधांचा समावेश आहे. याचा इनेलो ब्रँडसाठीही उपयोग केला जाणार आहे. अर्थात, इनेलोच्या माध्यमातून सादर करण्यात येणारी सर्व उत्पादने ही फक्त ऑनलाइन या पद्धतीतच उपलब्ध करण्यात येणार आहे.
यासाठी आयव्हुमीने अमेझॉन इंडियाशी सहकार्याचा करार केला आहे. या शॉपींग पोर्टलवरून येत्या काही दिवसांमध्ये इनेलो १ हा स्मार्टफोन सादर केला जाणार आहे. हे या ब्रँडचे पहिले प्रॉडक्ट असेल. यामध्ये नॉचयुक्त डिस्प्लेसह अनेक सरस फिचर्सचा समावेश असेल. विशेष बाब म्हणजे कंपनीने मेक इन इंडियाच्या अंतर्गत याला उत्पादीत केले आहे. या ब्रँडच्या अंतर्गत सादर करण्यात येणारी उत्पादने ही १५ हजार रूपयांच्या आतील असणार आहेत हे विशेष.