नवी दिल्ली:ट्विटर (Twitter) सध्या चांगलेच चर्चेत आहे, ते म्हणजे तेथील नियम आणि कारवायांमुळे. इलॉन मस्कने (Elon Musk) ट्विटर खरेदी करताच कारवाईचा धडाकाच सुरू केला आहे. अगदी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (Parag Agarawal) यांनाही नोकरी गमवावी लागली आहे. ट्विटरचा अनेकांना नोकरी सोडा, असा आदेशच आला आहे. यावर ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्या व्यक्तीने ट्विटरला जन्म दिला, त्यालाही आता मोठा पश्चात्ताप होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, ट्विटरवरच त्यांनी नोकरी गमावलेल्या जगभरातील ट्विटर कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. तुम्ही ज्या संकटातून जात आहात, त्याला मी जबाबदार आहे, असे म्हणत ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनी माफी मागितली.
शुक्रवारपासून ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांच्या आदेशानुसार, जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर, ‘ट्विटरचे आधीचे आणि सध्याचे कर्मचारी लोक कणखर आणि लवचिक आहेत. कितीही कठीण वेळ असली, तरीही त्यांना मार्ग सापडेल. अनेक जण माझ्यावर नाराज आहेत, याची कल्पना आहे. प्रत्येक जण ज्या परिस्थितीत आहे, त्याला मी जबाबदार आहे. मी कंपनी खूप लवकर मोठी केली. त्याबद्दल मी माफी मागतो,’ अशा आशयाचे ट्विट डॉर्सी यांनी केले.