जेबीएल कंपनीने गो प्लस या नावाने नवीन ब्ल्युटुथ कनेक्टीव्हिटी असणारा वायरलेस स्पीकर भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. हर्मन इंटरनॅशनलची मालकी असणार्या जेबीएलने भारतीय बाजारपेठेवर आपले लक्ष जाणीवपूर्वक केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. या कंपनीने आपले ऑनलाईन स्टोअरदेखील सुरू केले असून यावरूनच जेबीएल गो प्लस हा ब्ल्युटुथ स्पीकर लाँच केला आहे. याचे मूल्य ३,४९९ रूपये आहे. नावातच नमूद असल्यानुसार यामध्ये ब्ल्युटुथ कनेक्टीव्हिटी प्रदान करण्यात आली आहे. याच्या मदतीने हा स्पीकर स्मार्टफोन अथवा टॅबलेटला कनेक्ट करता येणार आहे.
नॉईस कॅन्सलेशन तंत्रज्ञानाचा यामध्ये वापर करण्यात आलेला आहे. यातील स्पीकरफोनचा वापर करून युजरला कनेक्ट असणार्या स्मार्टफोनवरून कॉल करू वा रिसीव्ह करू शकणार आहे. यामध्ये पारंपारिक हेडफॉन जॅकचे सॉकेटदेखील देण्यात आले आहे. यामुळे याचा वायरयुक्त वापरदेखील करता येणार आहे. जेबीएल गो प्लस या मॉडेलमध्ये अतिशय दर्जेदार बॅटरी प्रदान करण्यात आलेली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल पाच तासांचा बॅकअप देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या मॉडेलचा लूक अतिशय आकर्षक असाच आहे. हे मॉडेल आकाराने आटोपशीर असून कुठेही अगदी सहजपणे नेण्यासारखे आहे. यामुळे कोणत्याही आऊटडोअर कार्यक्रमासाठी हा ब्ल्युटुथ स्पीकर उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन कंपनीने केले आहे