सोनी कंपनीच्या पाठोपाठ जेबीएलनेही गुगल असिस्टंटचा समावेश असणारे स्मार्ट स्पीकर सादर करण्याची घोषणा केली आहे. गुगल कंपनीने आपला गुगल असिस्टंट थर्ड पार्टीजसाठी खुला करण्याची घोषणा केल्यानंतर सोनी कंपनीने याचा समावेश असणारा डिजीटल स्मार्ट असिस्टंट लाँच केला आहे. या पाठोपाठ ध्वनी उपकरणांमधील आघाडीचे नाव असणार्या जेबीएल कंपनीनेही लिंक १०, लिंक २० आणि लिंक ३०० हे तीन स्मार्ट स्पीकर सादर करण्याची घोषणा केली आहे. या तिन्ही मॉडेलमध्ये गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट या तंत्रज्ञानांचा इनबिल्ट सपोर्ट असेल. यामुळे कुणीही ओके गुगल म्हणून आपल्याला हवी ती व्हाईस कमांड देऊ शकतो. यात संगीत ऐकण्यापासून ते दैनंदिन कामकाजाचे नियोजन (प्लॅनर), हवामानाची माहिती, गुगल सर्च आदींच्या कार्यान्वयनाचा समावेश आहे. तसेच याला अन्य उपकरणे कनेक्ट करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.
जेबीएल लिंक १० आणि लिंक २० या मॉडेल्समध्ये रिचार्जेबल बॅटरी देण्यात आली असून ती सुमार पाच तासांपर्यंत बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर लिंक ३०० या मॉडेलमध्ये बॅटरी नसून एसी इनपुट देण्यात आले आहे. जेबीएल लिंक१० मध्ये ८ वॅटचे दोन स्पीकर असतील. लिंक २०मध्ये १० वॅटचे दोन तर लिंक ३०० स्पीकरमध्ये ५० वॅटचे दोन स्पीकर देण्यात आले आहेत. यातील पहिले दोन स्पीकर हे वॉटरप्रूफ असले तरी तिसर्यात मात्र ही सुविधा नाही. तर हे तिन्ही स्मार्ट स्पीकर वाय-फाय आणि ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटीने सज्ज असतील. जेबीएलजे हे तिन्ही स्मार्ट स्पीकर ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीत पहिल्यांदा मिळणार असून त्यांचे मूल्य अनुक्रमे १६९, १९९ आणि २९९ युरो इतके असेल.