नवी दिल्ली : देशातील नंबर वन खासगी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) आजही आपल्या स्वस्त प्लॅन्ससाठी ओळखली जाते. दरम्यान, लवकरच जिओ आपल्या युजर्संना सॅटेलाइटद्वारे 100Gbps च्या जबरदस्त स्पीडमध्ये इंटरनेट मिळणार आहे. कंपनी सॅटेलाइट आधारित तंत्रज्ञान वापरून लोकांना परवडणारी ब्रॉडबँड सेवा देणार आहे.
या नेटवर्कमध्ये जिओस्टेशनरी (GEO) आणि मीडियम अर्थ ऑर्बिट (MEO) सॅटेलाइट्सचा वापर केला जाईल. याचा मल्टी-गीगाबिट लिंक भारत आणि इतर देशांतील उद्योग, मोबाइल आणि सामान्य ग्राहकांना जोडण्यास सक्षम असेल. रिलायन्स जिओने सॅटेलाइटद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी SES सोबत हातमिळवणी केली आहे. या संयुक्त उपक्रमात रिलायन्स जिओची 51 टक्के आणि SES ची 49 टक्के भागिदारी असणार आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट पोहोचेलसंयुक्त उपक्रमात, SES आपले मॉडर्न सॅटेलाइन देईल आणि रिलायन्स जिओ गेटवे पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन करेल. या करारांतर्गत, जिओ पुढील काही वर्षांत जवळपास 100 मिलियन अमेरिकी डॉलरचे गेटवे आणि उपकरणे खरेदी करेल. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, नवीन डिजिटल अर्थव्यवस्थेत पूर्ण भागीदारीसाठी ब्रॉडबँडचा वापर करणे आवश्यक आहे, हे कोरोना संकट काळात समजून आले. रिलायन्स जिओ आणि SES भारताला डिजिटल सेवेशी जोडण्यासाठी काम करतील जे आरोग्य आणि सरकारी सेवा तसेच दुर्गम भागात दूरस्थ शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देतील. दरम्यान, कंपनीने म्हटले आहे की, यासोबतच कंपनी 5G मध्ये गुंतवणूक करणे थांबवणार नाही.