एअरटेलने पहिल्याच दिवशी ५जी आठ शहरांत सुरु करून रिलायन्स जिओला मोठा धक्का दिला होता. असे असताना एअरटेलची ही खेळी परतवून लावण्यासाठी रिलायन्स जिओने उद्याच ५जी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चार शहरांत Reliance Jio 5G network सुरु केले जाणार आहे.
एअरटेलने भारतात ५जी सेवा सुरु करून आघाडी घेतली आहे. परंतू, ४जी सेवा सुरु करून धुमाकूळ उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओचे ग्राहक अद्याप तरी ५जी कधी सुरु होणार याचीच वाट पाहत आहेत. असे असताना रिलायन्स जिओच्या ५जी बाबत मोठी अपडेट आली आहे.
दसऱ्याच्याच दिवशी Jio True 5G सेवा ही दिल्ली, वाराणसी, मुंबई आणि कोलकाता या चार शहरांत सुरु होणार आहे. ५ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरु होत आहे. परंतू, सर्वच ५जी मोबाईल युजर ही सेवा वापरू शकणार नाहीत. कंपनीने यासाठी वेलकम ऑफर जारी केली आहे. यानुसार कंपनी तुम्हाला ५जी नेटवर्क वापरण्याची संधी देणार आहे. यासाठी तुम्ही कंपनीला फिडबॅक देऊ शकणार आहात.
जिओने ५जी सेवा इन्व्हाईट बेस्ड ठेवली आहे, म्हणजेच कंपनी ग्राहकांना ५जी सेवा वापरण्यासाठी निमंत्रित करणार आहे. ज्यांना हे निमंत्रण मिळेल तेच लोक जिओची ५जी सेवा वापरू शकणार आहेत. किती ग्राहकांना कंपनी निमंत्रीत करणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाहीय. यानुसार १ जीबीपीएसपर्यंतचा स्पीड आणि अनलिमिटेड डेटा दिला जाणार आहे. कंपनी 700 MHz, 3500 MHz आणि 26 GHz बँडवर सेवा देईल. जिओ ही एकमेव कंपनी आहे जी ७०० मेगाहर्ट्झच्या बँडवर ५जी सेवा पुरवते. यामुळे तुम्हाला चांगले नेटवर्क कव्हरेज मिळण्याची अपेक्षा आहे.