देशात 5G लाँच करण्याची तयारी सुरु करा, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. आता कोणती कंपनी पहिली 5G सेवा सुरु करतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर रिलायन्सची वार्षिक बैठक याच महिन्याच्या अखेरीस होत आहे. या बैठकीत मुकेश अंबानी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षीच्या एजीएमच्या बैठकीत मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ स्वदेशी तंत्रज्ञानाने 5G लाँच करणार आहे, अशी घोषणा केली होती. ५जी तंत्रज्ञानासाठी जी यंत्रणा लागते ती रिलायन्स भारतातच बनविणार होती, यासाठी चिनी कंपन्यांची मदत घेतली जाणार नाही, अशी भूमिका रिलायन्सने घेतली होती.
रिलायन्सने नुकत्याच झालेल्या स्पेक्ट्रम लिलावात सर्वाधिक स्पेक्ट्रम विकत घेतले होते. याचबरोबर देशभरात फाईव्ह जी सुरु करण्याचे संकेत दिले होते. आता रिलायन्सची महत्वाची बैठक होत आहे, या बैठकीत रिलायन्स जिओ ५जी सेवेबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. याचबरोबर रिलायन्स स्वस्तातील ५जी स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स या महिन्यात JioPhone 5G लाँच करू शकते. 29 ऑगस्टला रिलायन्सची एजीएम होणार आहे. JioPhone 5G बद्दल असे सांगितले जात आहे की त्याची किंमत 12,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. हा स्मार्टफोन रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर केला जाऊ शकतो. मात्र, दिवाळीत तो बाजारात उपलब्ध होऊ शकतो. कंपनी JioPhone 5G मध्ये Qualcomm Snapdragon 480 प्रोसेसर वापरू शकते. यात 4GB पर्यंत रॅम आणि 32GB पर्यंत इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते.
JioPhone 5G मध्ये 6.5-इंचाची HD + IPS LCD स्क्रीन दिली जाऊ शकते. या फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देखील दिला जाऊ शकतो. त्याचा प्राथमिक कॅमेरा 13-मेगापिक्सलचा असू शकतो. यासोबत 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर दिला जाऊ शकतो.