टेलिकॉम सेक्टरमध्ये जिओने क्रांती केली आहे. एवढी वर्षे ग्राहकांना वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली लुटणाऱ्या कंपन्यांना चांगलाच दणका बसला आहे. 4G पासून सुरु झालेली जिओची घोडदौड 5G मध्येही सुरुच आहे. लवकरच भारतात फाईव्ह जीचे प्लॅन लाँच होणार आहेत. या पार्श्वभुमीवर जिओने अन्य कंपन्यांना खूपच मागे टाकले आहे.
रिलायन्स जिओच्या तिमाहीची आकडेवारी आली आहे. यामध्ये जिओचे फाईव्ह जी वापरणारे ९ कोटींहून अधिक ग्राहक जिओकडे आहेत. तसेच इंटरनेटचा वापर 31.5% वाढून 38.1 अब्ज जीबीपर्यंत गेला आहे. तसेच जिओच्या एकूण डेटा ट्रॅफिकपैकी २४ टक्के ट्रॅफिक हे जियो ट्रू 5G नेटवर्ककडे वळले आहे.
जिओची 4G सेवा पुरती कोलमडली आहे. आता फोरजी सेवेला टुजीचाही स्पीड भेटत नाहीय. साध्या ४०-५० केबीच्या इमेजही डाऊनलोड होताना मुश्किल होतेय. व्हिडीओदेखील प्ले होत नाहीएत. परंतु, फाईव्ह जीवर जीबी जीबीच्या फाईल काही सेकंदात डाऊनलोड होत आहेत. कॉलिंगलाही समस्या येत आहे. अनेकांना कॉल ड्रॉप किंवा समोरच्याचे ऐकायलाच येत नाही अशा समस्यांना वारंवार तोंड द्यावे लागत आहे. यामुळे अनेकजण व्हॉट्सअप कॉलकडे वळले आहेत.
जिओने फायबर सेवाही लाँच केली आहे. गावात पोहोचण्यासाठी एअर फायबर सेवाही आणली आहे. याचा फायदा जिओला होत आहे. परंतु, फोर जी सेवा कोलमडल्याने व कॉल ड्रॉपच्या समस्यांमुळे ग्राहक वैतागले आहेत. यामुळे ग्राहकांना पुन्हा पुन्हा कॉल करावे लागत आहेत.