बंगळुरू: स्वस्त इंटरनेट आणि फ्री कॉलिंगची सेवा देण्याच्या शर्यतीत आतापर्यंत केवळ रिलायन्स जिओचं नाव येत होतं. मात्र, आता रिलायन्स जिओलाही टक्कर देत एका नव्या स्टार्टअप कंपनीने सर्वच टेलीकॉम कंपन्यांची झोप उडवली आहे.बंगळुरू येथील वाय-फाय डब्बा नावाची ही कंपनी अत्यंत स्वस्त दरात इंटरनेट सेवा पुरवत आहे. 'भारतात अजूनही इंटरनेट महाग आहे, जिओ लॉन्च झाल्यापासून इंटरनेटच्या किंमती कमी झाल्यात तरीही भारतात किंमती जास्त आहेत. त्यामुळे इंटरनेट अजून कमी दरात पुरवणं शक्य आहे, अत्यंत स्वस्त दरात इंटरनेट सेवा पुरवण्याचं आमचं लक्ष्य आहे', असं अवघ्या एका वर्षाच्या या कंपनीचं म्हणणं आहे. वाय-फाय डब्बा ही कंपनी केवळ दोन रूपयात 100 एमबी डेटा, 10 रूपयात 500 एमबी डेटा आणि अवघ्या 20 रूपयात तब्बल 1 जीबी डेटा पुरवत आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 24 तासासाठी आहे. दुसरीकडे जिओ 19 रूपयात 150 एमबी डेटा आणि 52 रूपयात 1.05 जीबी डेटा पुरवते. सध्या ही कंपनी केवळ बंगळुरूत सेवा पुरवत आहे. ज्यांना रिचार्ज करायचं असेल त्यांना कंपनीचं हे डेटा प्रीपेड रिचार्ज कुपन छोट्या दुकानांवर, चहाच्या टपरीवर आदी ठिकाणी सहज उपलब्ध होईल. आम्ही वेगळ्या प्रकारचं अत्यंत वेगवान नेटवर्क देत आहोत. आम्ही बंगळुरू शहरात तुम्हाला सर्वात स्वस्त आणि सर्वात वेगवान वायफाय देत आहोत. असं कंपनीच्या वेबसाइटवर लिहीलं आहे.आता मार्केटमध्ये नवीन कंपनी आल्याने इतर कंपन्या काय पावलं उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवघ्या 2 रूपयात इंटरनेट, जिओसह सर्वच टेलिकॉम कंपन्यांची उडाली झोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 5:12 PM