- अमेय गोगटे, संपादक, लोकमत डॉट कॉम
'हॅकर' म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो 'डिजिटल चोर'. कोड क्रॅक करून गोपनीय माहिती चोरणारा, अकाउंट हॅक करणारा अज्ञात इसम. पण, यू-ट्युबवर एक 'हॅकर' असा आहे, जो माहिती चोरत नाही तर नवनवीन माहिती देतो, अकाउंट हॅक करून धक्का देण्याऐवजी, आगळेवेगळे प्रयोग करून आश्चर्याचे धक्के देतो आणि आपल्या चाहत्यांना 'लाईफ टाईम एक्सपिरियन्स' देण्यासाठी कधीकधी जीवावर उदारही होतो. तो म्हणजे 'मिस्टर इंडियन हॅकर', अर्थात दिलराज सिंह रावत.
दिलराज राजस्थानातील अजमेरचा. घरातल्या तोडक्या-मोडक्या वस्तू जमवून प्रयोग करत राहणं, हा त्याचा छंद. या छंदालाच 'करिअर' बनवता येतंय का, असा विचार करून दिलराजनं २०१७ मध्ये 'मिस्टर इंडियन हॅकर' हे यू-ट्युब चॅनल सुरू केलं. 'किल्लीविना कुलूप कसं उघडायचं?', या व्हिडीओमुळे त्याच्यासाठीही बरीच कुलुपं उघडली गेली आणि तो देशातला आघाडीचा 'इन्फ्लुएन्सर' बनला.
पेट्रोलऐवजी पाणी घालून बाईक चालव, दोन गाड्यांची टक्कर घडव, फटाके फोडून जगावेगळे 'धमाके' कर, कधी रसायनं, वायूंचं मिश्रणातून चमत्कार दाखव असे 'डेंजर' प्रकार हा 'इंडियन हॅकर' आणि त्याची 'टायटॅनियम आर्मी' करत असते. त्यातून बरंच काही शिकता येतं. 'मि. इंडियन हॅकर' या चॅनलचे आज २ कोटी ६४ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. चॅनलवर ८०८ व्हिडीओ अपलोड करण्यात आलेत आणि व्ह्यूजचा आकडा ४ अब्ज ५१ कोटी ८४ लाख ४१ हजार ५९४ इतका आहे. या चॅनलमधून दिलराजचं दर महिन्याचं उत्पन्न साधारण ३५ ते ४० लाखांच्या घरात असल्याचं समजतं. अर्थात, काही व्हिडीओ बनवण्यासाठी येणारा खर्चही मोठा आहे.