नवी दिल्ली, दि. 18 - गुगल ही तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी मोबाइल पेमेंटच्या क्षेत्रात प्रवेश करत आहे. ‘तेज’ अॅपद्वारे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आधारित डिजिटल पेमेंट सेवा गुगल आज लाँच करणार आहे. या अॅपद्वारे पैसे पाठवणे, बँक खात्यात थेट पैसे स्विकारणे, बिल पेमेंट अशा सुविधा ग्राहकाला मिळणार आहेत. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर ग्राहकाला ते थेट बँक खात्याशी जोडता येईल. तेज अॅपद्वारे पैशांचे ट्रान्सफर सोपे आणि सुरक्षित असेल असे गुगलकडून सांगण्यात आले आहे.
- यूपीआयद्वारे तुम्ही तुमचे बँक खाते तेज अॅपशी जोडल्यानंतर तुम्ही अत्यंत सुलभतेने एका बँकेतून दुस-या बँकेत रक्कम ट्रान्सफर करु शकता.
- या अॅपमध्ये सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. गुगलच्या विविध स्तरीय सुरक्षा प्रणालीमुळे हे अॅप वापरण्यास सुरक्षित असल्याचे गुगलकडून सांगण्यात आले आहे.
- तेजमधील कॅश मोडचा वापर करुन तुम्ही तात्काळ एखाद्याला पैसे पाठवू शकता किंवा पैसे स्विकारु शकता. त्यासाठी तुम्हाला फोन किंवा बँक अकाऊंटचा नंबर अशी खासगी माहिती शेअर करण्याची गरज नाही.
- तेज अॅपवर इंग्रजी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नडा, मराठी, तामिळ आणि तेलगु भाषा उपलब्ध असतील.
- तेजमधील कॅश मोडचा वापर करुन तुम्ही जागीच चहावाल, दूधवाला, सलूनवाला यांना डिजिटल पेमेंट करु शकता.
- या अॅपद्वारे डेबिट आणि क्रेडिट कार्डने पेमेंट करायची सुविधा सुद्धा लवकरच उपलब्ध होणार आहे.
बक्षीस जिंकण्याची संधी
-अॅपमध्ये तेज स्क्रॅच कार्ड असेल. योग्य व्यवहारासाठी ग्राहकाला 1 हजार रुपयापर्यंत रक्कम जिंकता येईल.
- तेज लकी रविवारी स्पर्धेत ग्राहकाला दर आठवडयाला 1 लाखापर्यंत रक्कम जिंकता येईल.
- 50 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा व्यवहार करणारेच तेज अॅप स्पर्धेसाठी पात्र असतील.
‘तेज’ हे ‘मेक इन इंडिया’ उत्पादन असून, ‘अँड्रॉईड पे’प्रमाणे ते काम करणार आहे. तेज हा हिंदी शब्द असून, त्याचा अर्थ आहे गती. गतिमान सेवेचे प्रतीक म्हणून हे नाव गुगलने निवडले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
यूपीआय ही पेमेंट सिस्टीम नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) लाँच केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ती चालवली केली जाते. मोबाइल प्लॅटफॉर्मवर दोन बँक खात्यांत पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा ही सिस्टीम उपलब्ध करून देते.भारतातील झपाट्याने वाढणा-या डिजिटल पेमेंट बाजारात आणखी काही बड्या कंपन्या उतरत आहेत.
फेसबुकच्या मालकीच्या व्हॉटस्अॅपचा त्यात समावेश आहे. यूपीआय आधारित इंटरफेस प्लॅटफॉर्म विकसित करीत असल्याची घोषणा व्हॉटस्अॅपने याआधीच केली आहे. आपली ही सेवा सुरू करण्यासाठी व्हॉटस्अॅपकडून एनपीसीआय आणि काही बँकांशी चर्चा सुरू असल्याचे वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते.