कुलपॅड कंपनीने गेल्या वर्षी सादर केलेल्या कुल प्ले ६ या स्मार्टफोनसोबतच कुलपॅड मेगा ४ ए या मॉडेलची घोषणा करण्यात आली होती. तथापि, याच्या लॉचींगला विलंब झाला होता. या पार्श्वभूमीवर, आता हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवरून आहे. यात हा स्मार्टफोन फक्त ऑफलाईन पध्दतीत अर्थात देशभरातील शॉपीजमधून मिळणार असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
कुलपॅड मेगा ४ ए या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजे १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम नेमकी किती असेल हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. तथापि, यात १६ जीबी इतके इनबिल्ट स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा असणार आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणार आहे. यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणार आहे. मात्र यातील कॅमेरे आणि अन्य फिचर्सची माहिती अद्याप कंपनीने दिलेली नाही.
कुलपॅड कंपनीने भारतीय बाजारपेठेत गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून कोणतेही मॉडेल लाँच केलेले नाहीत. यातच अन्य कंपन्यांनी किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारे मॉडेल्स लाँच करण्याचा सपाटा लावला असतांना या कंपनीने दीर्घ काळाचा विराम घेतला. या पार्श्वभूमिवर, कुलपॅड मेगा ४ ए या मॉडेलला चांगला प्रतिसाद मिळण्याची कंपनीला आशा आहे. तथापि, आता एंट्री लेव्हलच्या सेगमेंटमधील स्मर्धा अजून तीव्र झालेली असल्यामुळे हे वाटते तितके सोपे नव्हेच!