कुलपॅड कंपनीने आपल्या कुलपॅड नोट ५ लाईट या स्मार्टफोनची ३२ जीबी स्टोअरेजयुक्त नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर केली आहे.
या वर्षी मार्च महिन्यात कुलपॅड नोट ५ लाईट हा स्मार्टफोन ३ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोअरेजच्या पर्यायात सादर करण्यात आला होता. आता याची रॅम कायम ठेवून स्टोअरेज ३२ जीबी इतके देण्यात आले आहे. हा स्मार्टफोनही आधीच्याच म्हणजेच ८,१९९ रूपयात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. अर्थात मूल्य कायम राखत या मॉडेलचे स्टोअरेज वाढविण्यात आले आहे. विशेष म्हणजे मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोअरेज वाढविण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.
कुलपॅड नोट ५ लाईट या स्मार्टफोनमध्ये मेटलबॉडी प्रदान करण्यात आल आहे. यात पाच इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा २.५ डी वक्राकार डिस्प्ले देण्यात आला आहे. ६४ बीट क्वाड-कोअर मीडियाटेक एमटी६७३५ प्रोसेसरने सज्ज असणार्या या स्मार्टफोनमध्ये २५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. यातील मुख्य कॅमेरा १३ तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असेल.
कुलपॅड नोट ५ लाईट हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा कुल युआय ८.० हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्टसह वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स देण्यात आले आहेत. गोल्ड, रॉयल गोल्ड आणि ग्रे या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये भारतीय ग्राहकांना हा स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला आहे.