गाझियाबाद : अनेकजण कार्यालयातून घरी आल्यावरही लॅपटॉपवर काम करत असतात. अशावेळी सोफा, बेडवर बसून किंवा झोपून लॅपटॉप सुरू ठेवला जातो. हे जीवावर बेतू शकते. सावध व्हा, कारण उत्तर प्रदेशमध्ये असा प्रकार घडला आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घराला आग लागली आहे.
हा इंजिनिअर दुसऱ्या खोलीमध्ये झोपला होता. सकाळी 8.30 च्या सुमारास जेव्हा धूर त्याच्या खोलीमध्ये पसरल्याने श्वास कोंडला तेव्हा त्याला समजले. जेव्हा तो खोलीतून बाहेर आला तेव्हा त्याने लॅपटॉप जळताना पाहिले. लॅपटॉपला लागलेली आग बेडवर पसरली होती. हे पाहून तो घाबरला आणि बाथरूमच्या वाटेने बाल्कनीद्वारे एका खांबावर चढला आणि लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू लागला.
हे पाहून शेजाऱ्यांनी अग्निशामक दलाला बोलावले. आग विझवितानाच या इंजिनिअरलाही सहाव्या मजल्यावरून खाली उतरवण्यात आले. हा इंजिनिअर नोएडाच्या एका कंपनीमध्ये काम करत असून पत्नीसह तो एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो. कंपनीचे रात्री आल्यावर काम करत असताना लॅपटॉपची स्क्रीन बंद करून तो दुसऱ्या खोलीत झोपायला गेला. तर सकाळी त्याची पत्नी शिक्षिका असल्याने नोकरीवर गेली. यानंतर 8.30 वाजता संपूर्ण घर धुराने भरले होते.
असा प्रकार तुमच्यासोबतही होऊ शकतो....बेडवर किंवा मांडीवर किंवा पोटावर ठेवून लॅपटॉप वापरू नका. बेडवर धूळ असल्याने ती खालील फॅनमध्ये जाते आणि हवा आत येण्याचा मार्ग रोखला जातो. यामुळे लॅपटॉपमधील उष्णता बाहेर पडू शकत नाही. लॅपटॉपचे काम झाल्यास तो बंद करावा. कधीही चार्जिंगसाठी सोडून जाऊ नका. जिथे लॅपटॉप ठेवला आहे ती जागा घट्ट लादी किंवा पॅडसारखी असायला हवी. बॅटरी खराब झाली असल्यास तातडीने बदलावी.