विवो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी आपले ई-स्टोअर सुरू केले असून पहिल्या तीन दिवसांमध्ये लाँच कार्निव्हलच्या अंतर्गत विविध मॉडेल्सवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. विवो कंपनीने भारतीय बाजारपेठेवर आपली पकड मजबूत केली आहे. अन्य चीनी कंपन्यांप्रमाणे किफायतशीर दरात उत्तमोत्तम स्मार्टफोन्स सादर करण्यास विवोने प्राधान्य दिले आहे. याच्या जोडीला विवोने देशाच्या कान्याकोपर्यात आपल्या विक्रेत्यांचे जाळे विणले आहे. शाओमी आणि वन प्लस सारख्या कंपन्यांनी पहिल्या टप्यात ऑनलाईन विक्रीचा पॅटर्न यशस्वीपणे राबविला होता. तर याच्या अगदी उलट विवोसह ओप्पो, जिओनी आदी कंपन्यांनी ऑफलाईन विक्रीला प्राधान्य दिले होते. यथावकाश या सर्व कंपन्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन विक्रीतंत्राची समतोल प्रणाली विकसित केली आहे.
या अनुषंगाने विवो कंपनीने आपले ई-स्टोअर सुरू केले आहे. अर्थात यावरून विवो कंपनीची सर्व उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. विवो ई-स्टोअर सुरू करतांना कंपनीने १६ ते १८ जानेवारीच्या दरम्यान लॉचींग कार्निव्हलची घोषणा केली आहे. याच्या अंतर्गत विविध मॉडेल्सवर आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत. याच्या अंतर्गत विविध मॉडेल्सवर २ हजारापर्यंतची सलवत मिळणार आहे. याशिवाय ग्राहकाला बुक माय शो तर्फे ५०० रूपयांचे व्हाऊचरदेखील मिळणार आहे. १० विजेत्यांना कंपनीचा ब्ल्यु-टुथ स्पीकर भेट म्हणून मिळणार आहे. तर विवो व्ही७ आणि व्ही७ प्लस या मॉडेल्सवर मोफत वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट मिळेल. याच्या सर्व मॉडेल्सवर झीरो कॉस्ट इएमआयची सुविधा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे देशभरातील तब्बल १० हजार पीनकोडच्या क्षेत्रात विवो कंपनी ग्राहकांना उत्पादने थेट त्यांच्या घरी पोहचवणार आहे. कुणीही विवो कंपनीच्या ई-स्टोअरला (http://shop.vivo.com/in) भेट देऊन या विविध ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.