लाव्हा मोबाईल्स कंपनीने अँड्रॉइड गो या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा लाव्हा झेड ६१ हा स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे.
गुगलने कमी रॅमच्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइडच्या अद्ययावत आवृत्तीचा वापर करता यावा म्हणून विकसित केलेल्या अँड्रॉइड गो या प्रणालीवर आधारित विविध स्मार्टफोन्स बाजारपेठेत उपलब्ध होत आहेत. यात आज लाव्हा झेड ६१ या स्मार्टफोनच्या माध्यमातून एका नवीन मॉडेलची भर पडली आहे. अर्थात युजरला यात अँड्रॉइड ओरियो (गो एडिशन) या प्रणालीतील सर्व फिचर्सचा वापर करता येणार आहे. हा स्मार्टफोन देशभरातील रिटेल शॉपीजमधून ५,७५० रूपये मूल्यात ग्राहकांना सोनेरी आणि काळा या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.
लाव्हा झेड ६१ या मॉडेलमध्ये ५.४५ इंच आकारमानाचा आणि फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले एचडी प्लस अर्थात १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण देण्यात आले आहे. क्वॉड-कोअर प्रोसेसरवर चालणार्या या स्मार्टफोनची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात २ जीबी रॅम असणारे दुसरे व्हेरियंटदेखील येणार असले तरी अद्याप याला बाजारपेठेत सादर करण्यात आलेले नाही.
ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅश या फिचर्सने युक्त असणारा यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा हा ५ मेगापिक्सल्सचा असून यात बोके इफेक्टचे फिचर देण्यात आले आहे. यात ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून याला एकदा चार्ज केल्यानंतर दीड दिवसांचा बॅकअप मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
या स्मार्टफोनसोबत काही आकर्षक ऑफर्स देण्यात येत आहेत. यामध्ये जिओ कंपनी संबंधित ग्राहकाला २२०० रूपयांचा कॅशबॅक देणार आहे. हा कॅशबॅक प्रत्येकी ५० रूपयांच्या ४४ रिचार्ज व्हॉऊचर्सच्या माध्यमातून मिळणार आहे. याला कुणीही माय जिओ अॅपवरून मिळवू शकणार आहे. जिओच्या नवीन आणि विद्यमान या दोन्ही ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. तर लाव्हा कंपनीने वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधादेखील दिली आहे.