लेनोव्हो कंपनी जगात सर्वात पहिल्यांदा ५-जी नेटवर्क कनेक्टीव्हिटी असणारा स्मार्टफोन सादर करणार असून यात क्वॉलकॉमचा अद्ययावत प्रोसेसर वापरण्यात येणार आहे.
५-जी म्हणजेच पाचव्या पिढीतील सेल्युलर नेटवर्क लवकरच कार्यान्वित होणार आहे. यासाठी विविध पातळ्यांवरून प्रयत्न सुरू आहेत. मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्या यासाठी आपल्या सर्व पायाभूत सुविधा अद्ययावत करत आहेत. तर याच्याशी संबंधीत विविध उपकरणे आणि सुट्या भागांच्या उत्पादनालाही वेग आला आहे. या अनुषंगाने हँडसेट उत्पादकांनीही ५-जी क्रांतीवर स्वार होण्याची जय्यत तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. याच्या अंतर्गत ही कंपनी येत्या काही महिन्यांमध्येच या नेटवर्कचा सपोर्ट असणारा स्मार्टफोन लाँच करणार आहे लेनोव्होचे उपाध्यक्ष चँग चेंग यांनीच वेईबो या चीनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची अधिकृत घोषणा केली आहे. यानुसार लेनोव्होच्या या आगामी स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८५५ हा प्रोसेसर वापरला जाणार आहे. क्वॉलकॉमने अद्याप या प्रोसेसरची घोषणा केलेली नाही. तथापि, नोव्हेंबर महिन्यात हा प्रोसेसर अधिकृतपणे बाजारपेठेत दाखल होणार असून यानंतर लागलीच याचवर चालणारा स्मार्टफोन लेनोव्हो कंपनी सादर करणार आहे.
५-जी नेटवर्कमध्ये अतिशय वेगवान गतीने इंटरनेटची सुविधा मिळणार असून यामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये आमूलाग्र क्रांती घडून येणार असल्याची भाकिते आधीच करण्यात आलेली आहे. यामुळे विशेष करून स्मार्ट होम आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज या प्रणालींना प्रचंड गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात स्मार्टफोनच्या माध्यमातून जगातील अब्जावधी लोकांच्या हातामध्ये वेगवान संदेश वहनाचे टुल मिळणार आहे. हुआवे कंपनीने आधीच या नेटवर्कसाठी आवश्यक असणारा मॉडेम तयार करून याला प्रदर्शीतदेखील केले आहे. हीच कंपनी ५-जी स्मार्टफोन तयार करणार असली तरी याला थोडा विलंब होणार आहे. साधारणपणे २०१९च्या पूर्वार्धात हुआवेचा हा नवीन स्मार्टफोन येऊ शकतो. मात्र लेनोव्हो याच्या अनेक महिन्यांच्या आधीच ५-जी मॉडेल लाँच करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अर्थात सॅमसंग, ओप्पो, शाओमी, वनप्लस आदी कंपन्यांनीही या प्रकारचा हँडसेट बनविण्याचे प्रयत्न सुरू केल्याची बाबदेखील आपल्याला विसरता येणार नाही.