अलीकडच्या कालखंडात टॅबलेटच्या विक्रीत सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी बाजारात नवनवीन टॅबलेट दाखल होत आहेत. यात आता लेनोव्हो टॅब ७ ची भर पडली आहे. हा टॅबलेट ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून ९,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येईल. यात ६.९८ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा आयपीएस या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात क्वाड-कोअर मीडीयाटेक एमटी८७३५बी हा प्रोसेसर दिलेला असेल. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
लेनोव्हो टॅब ७ या मॉडेलमध्ये ऑटो-फोकससह ५ मेगापिक्सल्सचा मुख्य तर २ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यातील फ्रंट स्पीकर हे डॉल्बी अॅटमॉस तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. यामुळे यात अतिशय उत्तम दर्जाच्या ध्वनीची अनुभुती घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यातील बॅटरी ३,५०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा टॅबलेट अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. यात लेनोव्हो फ्रेमवर्क, लेनोव्हो अकाऊंट, गुगल कॅलेंडर, गुगल शीटस् आदी अॅप प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहेत. तसेच यात मल्टी युजर-मल्टी स्पेस हे विशेष फिचर देण्यात आले आहे. याच्या मदतीने कुणीही आपल्या माहितीचा अॅक्सेस सुरक्षित ठेवत हा टॅबलेट इतरांना वापरण्यासाठी देऊ शकतात.
यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क कनेक्टिव्हिटी असून यावरून व्हाईस कॉलींगची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय यात थ्री-जी व २-जीचा सपोर्टदेखील असेल. तसेच यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, युएसबी, युएसबी-ओटीजी आदी फिचर्स असतील.