लेफोन या चीनी कंपनीने भारतात या वर्षी एप्रिल महिन्यात पदार्पण केले आहे. या कंपनीने आधी डब्ल्यू २ आणि डब्ल्यू ७ हे दोन मॉडेल्स लाँच केले आहेत. आता याच मालिकेतील डब्ल्यू १५ हा स्मार्टफोन ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. अर्थात आधीप्रमाणेच हादेखील एंट्री लेव्हल या प्रकारातील स्मार्टफोन असेल. यात पाच इंची एचडी ( १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा ) २.५ डी वक्राकार डिस्प्ले असेल. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविता येईल. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा तर सेल्फीसाठी २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यात २००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.
लेफोन डब्ल्यू १५ या मॉडेलमध्ये २२ भारतीय भाषांचा सपोर्ट असेल. अर्थात ग्राहकांना आपापल्या भाषेत याचा युजर इंटरफेस वापरता येणार आहे. यात मराठीसह हिंदी, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, नेपाळी, ओरिया, मणिपुरी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे. अर्थात हे हा स्मार्टफोनचे वैशिष्ट्य ठरू शकते. लेफोन डब्ल्यू १५ हा स्मार्टफोन रेड, गोल्ड, सिल्व्हर आणि रोझ गोल्ड या चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले असून हे मॉडेल ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.