एलजी कंपनीने कँडी हा आपला अत्यंत किफायतशीर दराचा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. भारतीय बाजारपेठेत एंट्री लेव्हलचे स्मार्टफोन्स मोठ्या प्रमाणात खपतात. यावर अनेक भारतीय आणि चीनी कंपन्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. या तुलनेत एलजीसारख्या कंपनीने आजवर अल्प अपवाद वगळता मिड आणि फ्लॅगशीप या दोन्ही रेंजमधील मॉडेल्सलाच प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. तथापि, भारतीय बाजारपेठेतील ट्रेंड लक्षात घेता एलजीने आता कँडी हा किफायतशीर मूल्य असणारा स्मार्टफोन सादर केला आहे. याचे मूल्य ६,६९९ रूपये असून एलजीचा हा आजवरचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. याला ब्ल्यू, ब्लॅक, सिल्व्हर आणि गोल्ड या या चार रंगाच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे.
एलजी कँडी या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी अर्थात १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आला असला तरी त्याचे नेमके नाव जाहीर केलेले नाही. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यातील फ्रंट कॅमेर्यामध्ये ऑटो-शॉट, जेस्चर शॉट, क्विक शेअर आदी फिचर्स देण्यात आले आहेत. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या आवृत्तीवर चालणारे आहे. एलजी कँडी हा स्मार्टफोन शाओमीचा रेडमी ५ए, नोकिया २.१, मायक्रोमॅक्सचा भारत ५ प्रो तसेच सॅमसंगने अलीकडेच लाँच केलेल्या गॅलेक्सी जे२ कोअर या मॉडेल्सला आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.