एलजी कंपनी जून महिन्यात ज्युडी या नावाने नवीन स्मार्टफोन सादर करणार असून या उच्च श्रेणीतल्या मॉडेलमध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश असेल असे लीक्स समोर आले आहेत.
एलजी कंपनी बार्सिलोना शहरात होणार्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस-२०१८मध्ये आपल्या एलजी व्ही ३० या स्मार्टफोनची नवीन आवृत्ती सादर करणार असल्याची माहिती आधीच अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर, एलजी कंपनी जून महिन्यात उच्च श्रेणीतील नवीन मॉडेल लाँच करणार असल्याची माहिती ‘व्हेन्चरबीट’ या टेक पोर्टलने दिली आहे. हे मॉडेल एलजी जी७ नव्हे तर ‘ज्युडी’ या नावाने लाँच करण्यात येणार असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. यात या आगामी स्मार्टफोनचे फिचर्सदेखील देण्यात आले आहेत. यानुसार एलजी ज्युडी या मॉडेलमध्ये ६.१ इंच आकारमानाचा, १८:९ असे गुणोत्तर असणारा आणि एचडीआर१० या तंत्रज्ञानाचा सपोर्ट असणारा डिस्प्ले असेल. या डिस्प्लेमध्ये एमएलसीडी प्लस या तंत्रज्ञानाचा वापर केलेला असेल. यामुळे अन्य आयपीएस डिस्प्लेंच्या तुलनेत हा स्मार्टफोन अधिक ब्राईटनेसयुक्त असला तरी तब्बल ३५ टक्के कमी उर्जा वापरणारा असेल. याचा अर्थात बॅटरी बॅकअपवर अनुकुल परिणाम होणार आहे.
दरम्यान, एलजी ज्युडी या मॉडेलमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ हा प्रोसेसर देण्यात आला असून याची रॅम ४ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून शकते. तर यातील मुख्य कॅमेरा हा १६ मेगापिक्सल्सच्या ड्युअल कॅमेरा सेटअपने सज्ज असेल. तसेच या कॅमेर्यात आर्टीफिशियल इंटिलेजियन्सचा वापर करण्यात आलेला असेल असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. एलजी ज्युडी या मॉडेलमध्ये ‘बुम साऊंड’ या फिचरने सज्ज असणारे स्टीरिओ स्पीकर देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन डस्टप्रूफ तसेच वॉटरप्रूफ असून यात कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंटदेखील असेल. सर्वात महत्वाचे म्हणजे यातील बॅटरी ही वायरलेस चार्जींग या सुविधेने सज्ज असण्याची शक्यता आहे.