एलजी कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित व्ही ३० या फ्लॅगशीप स्मार्टफोनला बर्लीन शहरात आयोजित करण्यात आलेल्या आयएफए प्रदर्शनीमध्ये सादर करण्याचे जाहीर केले आहे.
एलजी व्ही ६ या स्मार्टफोननंतर ही कंपनी नेमके कोणते मॉडेल सादर करेल याबाबत जगभरात उत्सुकता लागून आहे. यातच अनेक लीक्सचा विचार करता एलजी व्ही ३० हे या कंपनीचे आगामी फ्लॅगशीप मॉडेल असेल अशी माहिती अलीकडच्या काळात समोर आली आहे. या पार्श्वभूमिवर एलजीने ३१ ऑगस्ट रोजी बर्लीन शहरात कार्यक्रमाचे आयोजन केली असून याची निमंत्रणपत्रे प्रसारमाध्यमांना पाठविली आहेत. याच कालखंडात बर्लीनमध्ये आयएफए हा टेक महोत्सव होत असल्याने या कार्यक्रमात एलजी व्ही ३० या मॉडेलचे अनावरण करण्यात येईल असे मानले जात आहे. या निमंत्रणपत्रात संबंधीत मॉडेलला सूचकरित्या दर्शविण्यात आले आहे. यामध्ये २:१ अस्पेक्ट रेशो व गोलाकृती कडा असणारी तसेच २८८० बाय १४४० पिक्सल्सच्या आकाराची निमंत्रण पत्रीका असून यावर व्ही या आकारातील उपकरण व त्याचे प्रतिबिंब दर्शविण्यात आले आहे.
एलजी व्ही ३० या मॉडेलमधील सर्व फिचर्सची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी यात एलसीडीऐवजी ओएलईडी डिस्प्ले असेल असे मानले जात आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर असून याची रॅम चार जीबी असेल. लक्षणीय बाब म्हणजे हे मॉडेल अँड्रॉइड ८.० अर्थात अँड्रॉइडच्या ओ या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे असेल अशी माहिती समोर आली आहे. अर्थात यामुळे याता टेकवर्ल्डचे लक्ष या इव्हेंटकडे लागून आहे.