एलजी व्ही 30 या स्मार्टफोनचे बर्लिन येथे झालेल्या आयएफएमध्ये अनावरण करण्यात आले होते. यानंतर हे मॉडेल अमेरिकेसह अन्य राष्ट्रांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. आता भारतीय ग्राहकांना हे मॉडेल डिसेंबर महिन्यात सादर करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती असून याचे मूल्य 47 हजार 990 रूपये असू शकते. या संदर्भात फोन रडार या टेक पोर्टलच्या वृत्तांतानुसार एलजी व्ही 30 सोबत बँग अँड ओल्फसन या कंपनीचा हेडफोन मोफत देण्यात येणार आहे.
एलजी व्ही 30 या स्मार्टफोनमध्ये ६ इंच आकारमानाचा 18:9 हे गुणोत्तर असणारा क्युएचडी म्हणजेच 1440 बाय 2880 पिक्सल्स क्षमतेचा ओएलईडी डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 635 प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज 64 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने दोन टेराबाईटपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारे असून यात लवकरच ओ या आवृत्तीचे अपडेट मिळणार आहे.
एलजी व्ही 30 या मॉडेलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. अर्थात याच्या मागील बाजूस 16 व 13 मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे आहेत. तर यातील फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल्सचा असेल. याच्या मुख्य कॅमेर्यात सिने व्हिडीओ हे विशेष फिचर देण्यात आले आहे. यात 16 विविध फिल्टर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, यात पॉइंट झूम हे फिचर असेल. यामुळे व्हिडीओ चित्रीकरण करताना स्क्रीनवरील कोणत्याही बिंदूपर्यंत झूम करता येणार आहे. याच्या मुख्य कॅमेर्यात क्रिस्टल क्लिअर या प्रकारातील लेन्स असेल. मल्टीमिडीयाच्या चांगल्या अनुभुतीसाठी यात हाय-फाय क्वॉड डीएसी हे फिचर देण्यात आले आहे. तर डिजीटल मायक्रोफोनमुळे दर्जेदार ध्वनीमुद्रण करता येणार आहे. एलजी व्ही 30 या मॉडेलमध्ये वायरलेस चार्जींगसह 3300 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्ट रेझिस्टंट आहे.