इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीतील बडी कंपनी एलजी (LG) मोबाईल बिझनेस (Mobile Business) युनिट बंद करणार आहे. स्मार्टफोनच्या बाजारात फारसा दम दाखवू न शकल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. स्मार्टफोन विभाग बंद केल्याने कंपनीला इलेक्ट्रीक व्हेईकल कंपोनंट्स, आर्टिफिशल इंटेलिजेंस, कनेक्टेड डिव्हाइसेस, स्मार्ट होम्स, बिझनेस-टू-बिझनेस सोल्यूशन सारख्या बाजारावर लक्ष केंद्रीत करता येणार आहे. (LG Electronics decide to close Smartphone unit.)
एलजीने सांगितले की, कंपनी आपला स्टॉक संपविणार आहे. हे फोन संपेपर्यंत बाजारात उपलब्ध असतील. कंपनी या फोनसाठी एका ठराविक कालावधीपर्यंत ग्राहकांना सर्व्हिस सपोर्ट आणि सॉफ्टवेअर अपडेट देत राहणार आहे. मोबाील बिझनेस येत्या 31 जुलैपर्यंत कायमचा बंद केला जाणार आहे. यासाठी कंपनीने काही तयारी देखील केली आहे. या तारखेनंतर देखील काही स्मार्टफोन बाजारात उपलब्ध असतील परंतू नवीन फोनचे उत्पादन बंद झाल्याने विक्री झाल्यानंतर एलजीचा एकही फोन बाजारात नसेल असेही कंपनीने सांगितले.
यामुळे एलजीच्या भविष्यातील स्मार्टफोनबाबतचे अंदाज आता थांबले आहेत. कंपनीनेच अधिकृतपणे हे सांगितल्याने यापुढे एलजीचे फोन मिळणार नाहीत. कंपनीने मोबाईल युनिटमधील काही कर्मचाऱ्यांना अन्य बिझनेस युनिटमध्ये बदली करण्यास सुरुवात केली आहे.
काही महिन्यांपूर्वीच एलजीने याबाबत संकेत दिले होते. यावेळी स्मार्टफोन युनिटच्या विक्रीचादेखील पर्याय कंपनीने विचारात घेतला होता. एलजी इलेक्ट्रॉनिक्सने यासाठी गुगल, फेसबुक, फोक्सवॅगन आणि व्हिएतनामच्या बीन ग्रुपशी देखील चर्चा करत होती. मात्र, कंपनीला डील करण्यात अपयश आले.
कंपनी सलग २३ तिमाही तोट्यात...एलजी कंपनीचा स्मार्टफोन बाजारातील हात काढून घेण्याचा निर्णय धक्कादायक नाही. कारण कंपनी 2015 च्या दुसऱ्या तिमाहीपासून सलग 23 तिमाहीमध्ये तोट्यात गेली आहे. एलजीने 2020 मध्ये एकूण 6.5 दशलक्ष युनिट पाठविले होते आणि 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा ग्लोबल शेअर हा 2 टक्के राहिला होता. सोनी कंपनीने दोन वर्षांपूवी भारतातील स्मार्टफोन बाजार गुंडाळला होता. चिनी कंपन्यांच्या कमी किंमती आणि आव्हानामुळे या मोठ्या कंपन्यांना व्यवसाय करणे कठीण जात होते.