एलजी कंपनीने सीईएस-२०१८च्या आधी आपल्या उत्पादनांची मालिका सादर केली असून यात गुगल असिस्टंटने युक्त असणार्या स्मार्ट स्पीकरचा समावेश आहे.
कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो म्हणजेच सीईएसमध्ये जगभरातील टेक कंपन्या आपापले अनेक नवीन प्रॉडक्ट लाँच करत असतात. तसेच याच्या आधी या प्रॉडक्टचे अनावरण करण्यात येते. या अनुषंगाने एलजी कंपनीने आपल्या विविध ऑडिओ उपकरणांचे अनावरण केले आहे. यात थिन क्यू या स्मार्ट स्पीकरचा समावेश आहे. यात अतिशय उच्च दर्जाच्या ध्वनीला कृत्रीम बुध्दीमत्तेची जोड देण्यात आली आहे. एलजीच्या अन्य उत्पादनांमधील तंत्रज्ञानाचा वापर यात करण्यात आल्यामुळे युजरला हाय रेझोल्युशनच्या ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे.
एलजी कंपनीने आधीच थिन क्यू ही व्हाईस कमांडची प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली गुगल असिस्टंट आणि अमेझॉनचा अलेक्झा या डिजीटल असिस्टंटशी सुसंगत अशी आहे. या अनुषंगाने थिन क्यू हा स्मार्ट स्पीकर गुगल असिस्टंटवर चालणारा आहे. यात ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांडच्या मदतीने विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करता येते. यात वेब सर्फींगसह वृत्त, हवामानविषयक माहिती, ई-कॉमर्स साईटवरील खरेदी आदी फंक्शन्सचा उपयोग करता येतो. याला स्मार्टफोन संलग्न करता येतो. यानंतर ध्वनी आज्ञावलीचा उपयोग करून स्मार्टफोनवरून कॉल करणे वा रिसीव्ह करणे, संदेशांची (एसएमएस) देवाण-घेवाण आदी बाबी शक्य आहेत. एलजी थिन क्यू हा स्मार्ट स्पीकर घरातील अन्य स्मार्ट उपकरणांशी (उदा लाईट, फ्रिज आदी) कनेक्ट करणेदेखील शक्य आहे. या मॉडेलचे मूल्य आणि उपलब्धता याबाबतची माहिती सीईएस-२०१८मध्ये जाहीर करण्यात येणार आहे.