काही स्मार्टफोन उत्पादक आपापल्या आगामी मॉडेल्सची अधिकृत लाँचिंगच्या आधी आपल्या संकेतस्थळावर लिस्टिंग करत असतात. या अनुषंगाने असुस कंपनीने आपल्या रशियन संकेतस्थळावर असुसच्या झेनफोन मॅक्स प्लस एम१ या मॉडेलची लिस्टींग केली आहे. अर्थात हा स्मार्टफोन लवकरच जागतिक बाजारपेठेत उतारण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या लिस्टिंगमध्ये संबंधित स्मार्टफोनचे मूल्य नमूद केलेले नसले तरी याचे सर्व फीचर्स जाहीर करण्यात आले आहेत.
या लिस्टिंगनुसार असुसच्या झेनफोन मॅक्स प्लस एम 1 या मॉडेलमध्ये ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजेच २१६० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी या प्रकारातील आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १८:९ असा आहे. यात मीडियाटेक एमटी६७५० टी हा प्रोसेसर असेल. याचे २ जीबी रॅम/१६ जीबी स्टोअरेज आणि ३जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट सादर करण्यात येणार आहेत. दोन्ही व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविण्याची व्यवस्था असेल.
यात ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. याच्या मागील बाजूस १६ व ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे असतील. यात एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकसची सुविधा देण्यात आली आहे. हा कॅमेरा फुल एचडी क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करू शकेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा झेन युआय ४.० प्रदान करण्यात आला आहे. यात तब्बल ४०३० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलीली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.