सध्या चांगल्या आरोग्यासाठी कोणता आहार घ्यावा किंवा आपण किती कॅलरी बर्न केल्या हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू आहेत. मात्र आता एक सोपं आणि खिशात मावणारं गॅजेट समोर आलं आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आहाराबाबत माहिती घेऊ शकाल. अमेरिकेतील लास वेगासमध्ये सुरु असलेल्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये(CES 2019) दोन हेल्थ केअर गॅजेटही सादर करण्यात आले आहेत. याद्वारे व्यक्तीच्या श्वासांचे विश्लेषण करुन हे सांगितले जाते की, त्यांनी त्यांच्या डाएटमध्ये कशाप्रकारे सुधारणा करायला हवी. पहिल्या गॅजेटचं नाव लुमेन आणि दुसऱ्या गॅजेटचं नाव फूडमार्बल असं आहे. हे दोन्ही गजेट्स आकाराने लहान असल्याने सहजपणे खिशातही ठेवले जाऊ शकतात. हे गॅजेट्स स्मार्टफोनशी जोडलेले असतात आणि यावर फूंकर मारल्यावर हे कळेल की, तुम्ही किती अन्न पचवत आहात किंवा किती कॅलरी बर्न करत आहात.
लुमेन देईल कॅलरींची माहिती
लुमेन एका इनहेलरच्या आकाराचं गॅजेट आहे, जे व्यक्तीच्या श्वासातील कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण मोजतं. हे तयार करणाऱ्या इंडिगोगो कंपनीने सांगितलं की, लुमेन व्यक्तीच्या मेटाबॉलिज्मवर लक्ष ठेवून असेल. कंपनीनुसार, या गॅजेटने माहीत पडेल की, हे पदार्थ खाल्ल्यावर व्यक्तीने किती कॅलरी बर्न केल्यात.
यात गॅजेटमध्ये फूंकर घातल्यावर स्मार्टफोन अॅपवर तुमचा डेटा समोर येणार आणि त्यातून हे कळणार की, तुम्ही किती कॅलरी किंवा फॅट बर्न केले आहेत. त्यासोबतच या अॅपवर अशा काही रेसिपीही सांगितल्या जातील ज्याद्वारे तुम्हाला फॅट बर्न करण्यास मदत होईल. सोबतच हेही सांगेल की, तुमच्यासाठी कोणता आहार सर्वात चांगला आहे.
कंपनीने लुमेनची किंमत २९९ डॉलर(२१ हजार रुपये) इतकी ठेवली आहे. याची विक्री मार्च महिन्यानंतर सुरु होईल. कंपनीनुसार, एक वर्षासाठी हे अॅप मोफत राहील, पण त्यानंतर हे पैसे देऊन खरेदी करावं लागेल.
फूडमार्बल कळेल किती अन्न पचवलं
फूडमार्बल हे गॅजेट सुद्धा लुमेनसारखंच काम करतं. फूडमार्बलमध्येही व्यक्तीला फूंकर मारावी लागते. याने हायड्रोजनचं प्रमाण किती आहे हे मोजलं जातं. कंपनीचे संस्थापक लिजा रुतलेज यांनी सांगितले की, हायड्रोजनने कळतं की, व्यक्तीला अन्न पचवण्यात अडचण येत आहे.
लिजा यांच्यानुसार, असं आतड्यांमध्ये फर्मेंटेशनमुळे होतं आणि या प्रक्रियेतून हायड्रोजन बाहेर येतं. त्यांनी सांगितले की, या गॅजेटने पोटदुखी, गॅसेस आणि आतड्यांमध्ये सूज या समस्या असणाऱ्या लोकांना मदत होईल. फूडमार्बलच्या माध्यमातून हायड्रोजन गॅसमुळे होणाऱ्या समस्यांची माहिती मिळवता येऊ शकते. तसेच या गॅजेटमुळे लोकांना हेल्दी डाएट घेण्यासही मदत मिळेल.