जगभरातून भारतात बनलेल्या स्मार्टफोनची मागणी वाढली आहे. एप्रिल ते जून तिमाहीत भारतातून 4,300 कोटी रुपयांचे स्मार्टफोन निर्यात करण्यात आले आहेत. स्वदेशी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झालेल्या वाढीमुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यातीत एकूण 250 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही माहिती इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) च्या रिपोर्टमधून समोर आली आहे.
इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) च्या रिपोर्टनुसार, गेल्या तिमाहीत जवळपास 1,300 कोटी रुपयांचे स्मार्टफोन निर्यात करण्यात आले होते. विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या काळात देखील मोबाईल हँडसेट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे.
कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या काळात भारत सरकारने प्रोडक्शन लिंक्ड इनिशिएटिव्ह (PLI) स्कीमच्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला मदत केली. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स गुड्सच्या निर्यातीत गेल्यावर्षीच्या तुलनेत 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती ICEA चे चेयरमन पंकज मोहिंद्रो यांनी दिली आहे.
स्मार्टफोन्सची निर्यात जरी वाढली असली तरी देशात आयात होणाऱ्या लॅपटॉप आणि टॅबलेट देखील 50 टक्क्यांनी वाढले आहेत. 2020-21 च्या तुलनेत 2021-22 मध्ये 6,000 कोटींची आयात 10,000 कोटी रुपयांवर गेली आहे. ICEA सरकार सोबत मिळून लॅपटॉप आणि टॅबलेटची आयात कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी देशातच लॅपटॉप आणि टॅबलेटची निर्मिती करण्यावर भर दिला जाईल.