महाराष्ट्र सायबर पोलिसांनी हैद्राबादमधून एका इंजीनियरला अटक केली आहे. या इंजिनियरवर विविध ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सॅटेलाइट चॅनल्सवरून पायरेटेड कंटेंट एका मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून स्ट्रीम करण्याचा आरोप आहे. सतीश वेंकटेश्वरलू असे या इंजिनियरचे नाव असून त्याला सोमवारी हैद्राबादमधून अटक करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Hyderabad engineer who ran Thop TV arrested for pirating OTT content)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय सतीश वेंकटेश्वरलू गेल्या 2 वर्षांपासून Thop TV अॅप चालवत होता. या अॅपवर सॅटेलाइट चॅनेल्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट मोठ्याप्रमाणावर उपलब्ध केला जात होता. हा कंटेंट लाखो युजर्स मोफत बघत होते तर यातील 5 हजार युजर्स सशुल्क वापर करत होते.
वायकॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर प्रसारण कंपन्यांनी या अॅपची तक्रार महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे केली होती. त्यांच्या माहितीविना आणि परवानगीविना इंजिनियर त्याच्या अॅपवर टीव्ही मालिका आणि चित्रपट प्रसारित करीत होता, अशी तक्रार प्रसारण कंपन्यांनी केल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. Thop Tv अॅपमुळे या कंपन्यांचे उत्पन्न बुडत होते. म्हणून कॉपीराईट कायद्याच्या उल्लंघन केल्याप्रकरणी सतीशला अटक करण्यात आली.
Thop Tv या अॅपवर फक्त एकाच छत्राखाली अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, हॉटस्टार अश्या लोकप्रिय स्ट्रीमिंग अॅप्सवरील वेब मालिका आणि चित्रपट उपलब्ध करण्यात आले होते. स्ट्रीमिंग अॅप्ससोबतच सॅटेलाईट चॅनल्सवरील कंटेंट देखील येथे मोफत उपलब्ध होता. काही खास फीचर्ससाठी फक्त 35 रुपये महिना शुल्क Thop Tv अॅप आकारात होते.