WhatsApp आणि YouTube सारख्या प्रसिद्ध प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात फसवणुकीची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. यूट्यूब व्हिडीओ लाइक करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ लाईक करण्याच्या बदल्यात पार्ट टाईम जॉबचं आश्वासन दिलं जात आहेत आणि हॅकर्स त्यांचा हेतू पूर्ण करतात. रिपोर्टनुसार, हॅकर्सनी सहज पैसे कमावण्याच्या आशेने एका दुकानदाराची तब्बल ५६ लाखांची फसवणूक केली.
सुरुवातीला दुकानदाराला यूट्यूबवर काही कामासाठी १२३ रुपये आणि ४९२ रुपये मिळाले. यामुळे खूश झालेल्या दुकानदाराला फसवणुकीत अडकवण्यात आलं. त्याला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडण्यात आलं, जिथे त्याला कमिशनचे आमिष दाखवून पैसे जमा करण्यास सांगण्यात आलं. दुकानदाराला हे समजलं नाही, त्याने ५६.७ लाख रुपये गुंतवले. मात्र त्यानंतर स्कॅमर्सनी त्याच्याशी संपर्क करणं बंद केलं आणि ही फसवणूक उघडकीस आली.
फसवणुकीपासून वाचण्यासाठी टिप्स
- कोणत्याही ऑनलाईन एक्टिव्हिटीमध्ये सहभागी होण्यापूर्वी, एखादी कंपनी किंवा व्यक्तीबद्दल योग्य रिसर्च केला पाहिजे.
- ऑनलाईन ऑफर्स आणि डिस्काउंट्स योग्यरित्या जाणून घ्या.
- व्हिडीओ लाईक करण्यासारख्या साध्या कामाच्या बदल्यात पैशाचे आमिष दाखवणाऱ्यांपासून सावध राहा.
- अनोळखी व्यक्ती आणि गटांकडून येणाऱ्या मेसेजपासून सावध राहा.
- तुम्हाला कोणत्याही ऑफरबद्दल शंका असल्यास, इतरांचा सल्ला घ्या. यामध्ये तुम्ही मित्र, कुटुंब किंवा सायबर सुरक्षा तज्ञांचा समावेश करू शकता.
- तुमचे पर्सनल डिटेल्स जसं की बँक तपशील, पासवर्ड किंवा OTP ऑनलाईन कोणाशीही शेअर करू नका.
- याशिवाय डिजिटल अरेस्टपासून सतर्क राहा.