ऑनलाईन फसवणुकीच्या घटना रोज समोर येत आहेत. एका व्यक्तीची 9.66 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. बँक कर्मचारी असल्याचे भासवून ऑनलाइन फसवणूक केली आहे. बँकेच्या नावाने एक फोन आला, ज्यामध्ये फोन करणार्याने स्वत:ची ओळख एका खासगी बँकेतील कर्मचारी असल्याच सांगून करून दिली.
कॉलरने सांगितले की, तो युजर्सना सायबर फ्रॉडपासून वाचवण्यासाठी काम करतो. स्कॅमर्सने व्यक्तीला त्याच्या बोलण्यात अडकवून डेबिट कार्ड आणि बँक डिटेल्स घेतले. त्यानंतर आरोपीने व्यक्तीच्या खात्यातून 9.66 लाख रुपये ट्रान्सफर केले.
बँकिंग फसवणूक किंवा ऑनलाइन फसवणुकीशी संबंधित हे पहिले प्रकरण नाही. अशी अनेक प्रकरणे रोज समोर येतात. सर्व बँका त्यांच्या युजर्सना सतत जागरूक करत आहेत. बँका नेहमीच त्यांचे बँकिंग तपशील इतर कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करण्यास नकार देतात. काही गोष्टींची काळजी घेतल्यास ऑनलाइन बँक सुरक्षित आहे.
'या' गोष्टी ठेवा लक्षात
1. इंटरनेट बँकिंगसाठी थर्ड पार्टी वेबसाइट्स कधीही वापरू नका. त्यापेक्षा थेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा किंवा तुम्ही बँकेचे मोबाइल App देखील वापरू शकता.
2. वेबसाइटचे डोमेन नाव नेहमी तपासा. URL काळजीपूर्वक वाचा आणि स्पेलिंगकडे विशेष लक्ष द्या. कारण स्कॅमर बँकेसारख्या नावाने अनेक बनावट वेबसाइट तयार करतात.
3. तुमचा पासवर्ड किंवा पिन शेअर करण्यास सांगणाऱ्या ईमेल किंवा मेसेजना प्रतिसाद देऊ नका. ना पोलीस, ना बँक, कोणीही तुमचा पासवर्ड विचारत नाही.
4. बँकिंग सेवा वापरण्यासाठी कधीही सायबर कॅफे किंवा शेअर्ड पीसी वापरू नका.
5. तुमचा पीसी नेहमी नवीन अँटी-व्हायरस आणि स्पायवेअर सॉफ्टवेअरसह अपडेट ठेवा.
6. तुमच्या सिस्टमवर फाइल आणि प्रिंटिंग शेअरिंग फीचर डिसेबल ठेवा.
7. जेव्हा तुम्ही PC वापरत नसाल तेव्हा तो लॉग ऑफ करा.
8. तुमचा बँकिंग आयडी आणि पासवर्ड इंटरनेट ब्राउझरवर सेव्ह करू नका.
9. तुमच्या बँक खात्याचा ट्रान्झेक्शन हिस्ट्री वेळोवेळी तपासत राहा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही ट्रान्झेक्शनची माहिती मिळेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.