भारतात लोक अगदी छोटं पेमेंट करण्यासाठी देखील UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) वापरतात. डिजिटल पेमेंटचा ट्रेंड इतका वाढला आहे की, आजकाल लोक कॅशलेस होऊन सर्व ठिकाणी फिरतात. पण आता चीनने या बाबतीत एक पाऊल पुढे टाकलं आहे आणि असं अफलातून तंत्रज्ञान आणलं आहे ज्याने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केलं.
तंत्रज्ञानाच्या जगात चीन सतत नवनवीन कामगिरी करत आहे. आता चीनच्या नव्या तंत्रज्ञानाने इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. आता लोक कार्ड किंवा मोबाईल वापरत नाहीत तर फक्त त्यांचा हात स्कॅन करून पेमेंट करतात.
हात स्कॅन करुन पेमेंट
आजकाल, 'वीचॅट पाम पे' नावाच्या चिनी तंत्रज्ञानाचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने लोक फक्त त्यांचा हात स्कॅन करून पेमेंट करू शकतात.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, एक माणूस चीनमधील ७-इलेव्हन स्टोअरमधून पाण्याची बाटली खरेदी करत होता. तो फोन, कार्ड किंवा इतर कोणत्याही गोष्टीशिवाय फक्त हात स्कॅन करून पैसे देताना दिसत आहे.
कसं काम करतं हे तंत्रज्ञान?
ही सिस्टम WeChat ने विकसित केली आहे. मे २०२३ मध्ये बीजिंग एअरपोर्ट एक्सप्रेस ट्रेन लाईन आणि शेन्झेन युनिव्हर्सिटीमध्ये हे पहिल्यांदा सादर करण्यात आलं. आता गुआंगडोंग प्रांतातील १,५०० हून अधिक ७-इलेव्हन स्टोअरमध्ये हे तंत्रज्ञान लागू करण्यात आलं आहे.
या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी युजर्सना सर्वप्रथम त्यांच्या WeChat अकाऊंटमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यांचा हात स्कॅन सिस्टममध्ये सेव्ह करावा लागेल. यानंतर जेव्हा जेव्हा त्यांना पेमेंट करायचं असेल तेव्हा त्यांना फक्त त्यांचा हात स्कॅनरवर ठेवावा लागेल आणि पेमेंट होईल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर भारत आणि चीनच्या डिजिटल पेमेंट तंत्रज्ञानाची तुलना सुरू झाली आहे.