मेटाचे संचालक आणि भारतातील भागीदारी प्रमुख मनीष चोप्रा यांनी राजीनामा दिला आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मूळ कंपनीला राजीनामा देणाऱ्यांच प्रमाण वाढतच आहे. नोव्हेंबर २०२२ पासून कंपनी सोडणारे चोप्रा हे चौथे वरिष्ठ अधिकारी आहेत. ते जानेवारी २०१९ मध्ये मेटामध्ये जॉईन झाले होते. आता त्यांनी मेटामधून राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी लिंक्डइवर दिली.
चोप्रा यांनी व्यावसायिकांसाठी लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म LinkedIn वर राजीनामा पोस्ट शेअर केला आहे. मात्र, कंपनीतून बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढील काही आठवडे मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मेटामधील प्रवासाबद्दल त्यांनी कंपनीचे आभार मानले.
मनीष चोप्रा यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे की, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या विकासासाठी आणि वाढीसाठी मेटाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. यासाठी त्यांनी मेटाचे आभार मानले. चोप्रा पुढे म्हणाले की, त्यांना त्यांच्या टीमचा आणि त्यांनी देशभरातील निर्माते आणि व्यवसायांचा सहयोगी बनण्यासाठी केलेल्या कामाचा खूप अभिमान आहे. त्यांनी पोस्टमध्ये सर्वांचे आभार मानले.
चोप्रा यांनी मेटासह जगभरातील नोकर कपातीचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले की अलिकडच्या काही महिन्यांत प्रत्येकासाठी खूप कठीण काळ गेला आहे. त्याच्या टीमने स्वतःची पर्वा न करता एकमेकांना खूप मदत केली. त्याच्या व्यावसायिक जीवनातील पुढच्या टप्प्याची वाट पाहत आहे. आगामी काळात जे काही घडेल, त्याची माहिती सांगेन असंही म्हटले आहे.
मेटाच्या भारत प्रमुख संध्या देवनाथन यांनी चोप्रा यांचे त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून मेटा सोडणारे चोप्रा हे चौथे वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्या आधी अजित मोहन (भारत प्रमुख), राजीव अग्रवाल (पब्लिक पॉलिसी चीफ) आणि अभिजित बोस (व्हॉट्सअॅप इंडिया हेड) यांनी एकामागून एक राजीनामा दिला.