Mark Zuckerberg : फेसबुक आणि इन्स्टाग्राम, या सोशल नेटवर्किंग साइट्समध्ये लवकरच मोठा बदल होणार आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामची मालकी असलेल्या मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. कंपनी आपला थर्ड-पार्टी फॅक्ट-चेकिंग प्रोग्राम बंद करत आहे. आता त्याच्या जागा 'कम्युनिटी नोट्स' नावाचा नवीन प्रोग्राम सुरू होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या नवीन प्रोग्रामद्वारे युजर्स स्वतः आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकतात. हा नवीन प्रोग्राम इलॉन मस्कच्या 'X' प्रमाणे काम करेल. अमेरिकेतून याची सुरुवात केली जाणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, थर्ड पार्टी फॅक्ट चेकर्स काही पूर्वाग्रह ठेवून काम करतात, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर कंटेटवर परिणाम पडतोय. त्यामुळेच आता मेटाने 'कम्युनिटी नोट्स' मॉडेल स्वीकारले आहे.
याबाबत मेटाचे चीफ ग्लोबल अफेयर्स ऑफिसर जोएल कॅपलन सांगतात की, 'आम्ही X वर हा प्रोग्राम पाहिला, तिथे युजर्स स्वतः निर्णय घेऊ शकतात. कुठली पोस्ट दिशाभूल करणारी आहे, याचा निर्णय स्वतः युजर्स घेऊ शकतात. याशिवाय, आम्ही काही विशिष्ट विषयांवरील निर्बंधही हटवणार आहोत. कंपनी आता बेकायदेशीर आणि उच्च तीव्रतेचे उल्लंघन, जसे दहशतवाद, पेडोफिलिया आणि ड्रग्सवर लक्ष केंद्रित करणार आहोत. मेटाने हेदेखील कबूल केले की, कंटेट मॉनिटर करण्यासाठी तयार केलेल्या जटिल प्रणालीने अनेक चुका केल्या आणि मोठ्या प्रमाणावर कंटेटला सेन्सॉर केले.