नवा मोबाइल घ्यायचाय… स्मार्टवॉच घ्यायचंय… नको जरा हटके स्पीकरच घेऊया.. पण नक्की कोणत्या कंपनीचा घ्यायचा? असे अनेक प्रश्न जेव्हा आपल्या डोक्यात घर करतात तेव्हा आपण इंटरनेटची मदत घेतो. प्रत्येक गॅजेट विकत घेऊन त्याची स्पेसिफिकेशन्स किंवा परफॉर्मन्स पाहणं शक्यच नसतं. पण असा एक टेक्नोसॅव्ही अवलिया आहे जो याच सगळ्यासाठी आपली मदत करतो. या टेक्नोसॅव्ही व्यक्तीचं नाव म्हणजे अरुण प्रभूदेसाई.
अरुण हा मूळचा पुणेकर. अवघ्या काही वर्षांत त्यानं शून्यापासून ते तब्बल साडेबारा मिलियनपर्यंतचा टप्पा गाठला. लोकांना आपल्या व्हिडीओमध्ये खिळवून ठेवणं, एखाद्या प्रोडक्टची संपूर्ण माहिती देणं, लोकांचे प्रश्न त्याची उत्तरं यामुळे त्याची नाळ नेटकऱ्यांशी जोडली गेली. २०११ पासून त्यानं चॅनल सुरू केले असला तरी त्याचा खरा प्रवास ऑक्टोबर २०१६ पासून सुरू झाला. ‘ट्रॅकिन टेक’ मराठी, हिंदी, इंग्रजी, ट्रेकिन ऑटो, ट्रेकिन शॉर्ट्स, ट्रेकिन के फंडे, टीकेएफ शॉर्ट्स असे यू ट्यूब चॅनल्स तो सध्या चालवतोय. त्याचं महिन्याचं उत्पन्न १५ ते ३५ लाखांच्या दरम्यान असल्याचं सांगण्यात येतंय.
‘मी टेक व्हिडीओ पाहायचो आणि मीसुद्धा यापेक्षा काही चांगलं करू शकतो असा माझा विश्वास होता,’ म्हणूनच एक छोटं ऑफिस मित्रासोबत शेअर केल्याचं त्यानं एका व्हिडीओत सांगितलं होतं. त्याला साथ दिली ती त्याचा मित्र प्रतीक ठाकूर यानं. सुरुवातीला केवळ ३०० सबस्क्रायबर्स होते. जेव्हा एखादं प्रोडक्ट लाँच व्हायचं तेव्हा तो ओपिनयन व्हिडिओ बनवीत होता. कालांतरानं त्यानं इंग्रजीमधून बाहेर येत हिंदी चॅनलही सुरू केले आणि त्यातल्या व्हिडिओला प्रतिसादही चांगला मिळाला. हळूहळू त्यानं त्याची टीमही वाढविली. ही आमची ट्रॅकिन टेक फॅमिली असल्याचंही तो सांगतो. आता त्यानं आपलं नवं ऑफिसही घेतलंय.