देशात ऑनलाईन फसवणुकीची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. कधी कधी स्कॅमर कॉल करून OTP मागतो, तर कोणीतरी बनावट लिंक पाठवून ती उघडण्यास सांगतो. स्कॅमर्स फसवणूक करण्याचे नवीन मार्ग शोधत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला असून, त्यात ऑनलाईन शॉपिंग कंपनी Meesho च्या एका कर्मचाऱ्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शिखर सक्सेना नावाच्या युजरने ट्विटरवर पोस्ट करून त्याला Whatsapp वर मेसेज पाठवून फसवणूक करण्याचा प्रयत्न कसा झाला हे सांगितले. शिखर हा मीशोचा कर्मचारी आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख मीशोचे सीईओ म्हणून करून दिली आणि शिखरला त्याच्या एका क्लाएंटसाठी भेटवस्तू ऑर्डर करण्यासाठी त्याचे पैसे वापरण्यास सांगितले. तो नंतर पैसे देईल असं म्हटलं. मेसेज वाचल्यानंतर शिखरला समजले की समोरची व्यक्ती आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे.
काही स्कॅमर्स आपल्या कंपनीचे बनावट CEO म्हणून मेसेज पाठवत आहेत. शिखरने या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. मेसेजमध्ये लिहिले होते की, "हॅलो शिखर, मी विदित आत्रेय, मीशोचा सीईओ आहे. आत्ता एका क्लाएंटसोबत कॉन्फरन्स कॉलवर आहे. मला या क्लाएंटला एक भेटवस्तू द्यायची आहे. तू पेटीएमने भेटवस्तूसाठी पैसे देऊ शकतोस का? मी तुला पैसे नंतर देईन."
मीशोचा कर्मचारी शिखर सक्सेना या जाळ्यात फसला नाही. इतरांना सावध करत, त्याने स्कॅमरशी झालेल्या चॅटचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला. तसेच स्टार्टअपच्या जगात नवीन घोटाळा. सीईओंकडून आलेला मेसेज असं कॅप्शन दिलं आहे. शिखरच्या या ट्विटला आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर शेकडो युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने विचारले - तुम्ही काय उत्तर दिले? यावर शिखरने सांगितले की, तो ट्विटरवर सार्वजनिक करू शकत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"