मेझू या कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी आपला मेझू प्रो ७ हा स्मार्टफोन सादर करण्याचे संकेत दिले असून याची अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवर लिस्टींग करण्यात आली आहे.मेझू कंपनीने गेल्या वर्षी चीनमध्ये मेझू प्रो ७ आणि मेझू प्रो ७ प्लस हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. या दोन्ही मॉडेल्समध्ये ड्युअल डिस्प्ले हे विशेष फिचर देण्यात आले होते. यातील मेझू प्रो ७ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्यात येत असल्याचे संकेत मिळाले आहेत. या स्मार्टफोनची अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून लिस्टींग करण्यात आली आहे. यानुसार हे मॉडेल ग्राहकांना २२,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. तथापि, याच्या उपलब्धतेबाबत अद्याप या लिस्टींगमध्ये माहिती देण्यात आलेली नाही.मेझू ७ प्रो या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा मुख्य डिस्प्ले असेल. तर याच्या मागच्या बाजूस १.९ इंच आकारमानाचा आणि २४० बाय ५३५ पिक्सल्स क्षमतेचा दुसरा डिस्प्ले दिलेला असेल. म्हणजेच या स्मार्टफोनच्या दोन्ही बाजूंनी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याच्या मागील बाजूस असणारा डिस्प्ले हा आकाराने लहान असला तरी यावर संबंधीत युजर विविध नोटिफिकेशन्स, वेदर अलर्ट आदींना पाहू शकतो. विशेष बाब म्हणजे यामुळे रिअर कॅमेर्याच्या मदतीने सेल्फी प्रतिमा काढणे सोपे होणार आहे. मीडियाटेक ऑक्टा-कोअर हेलिओ पी २५ या प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलमध्ये चार जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. मेझू ७ प्रो या मॉडेलमध्ये एफ/२.० अपार्चर, एलईडी फ्लॅश आणि पीडीएएफ या फिचर्सनी सज्ज असणारे १२ मेगापिक्सल्सचे दोन मुख्य कॅमेरे असतील. यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असून दोन्हीच्या माध्यमातून अतिशय उत्तम दर्जाचे छायाचित्र घेता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एफ/२.० अपार्चरसह १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. एमचार्ज या फास्ट चार्जींगच्या फिचरसह यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
मेझू प्रो ७ स्मार्टफोनची लिस्टींग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 3:38 PM