नवी दिल्ली - स्मार्टफोन हा प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्या युजर्ससाठी भन्नाट स्मार्टफोन लाँच करत असतात. चीनच्या Meizu या कंपनीने असाच एक अनोखा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे या स्मार्टफोनला एकही होल देण्यात आलेला नाही. तसेच स्पीकर आणि चार्जिंग पोर्टसाठीही होल नाही.
स्मार्टफोनमध्ये आवाज कमी जास्त करण्यासाठी एक बटण देण्यात येते. मात्र Meizu Zero या स्मार्टफोनमध्ये हे बटण नाही. आवाज वाढवण्यासाठी बटणाऐवजी बाजुला एक खास टच पॅनल लावण्यात आले आहे. तर स्पीकरसाठी डिस्प्लेमध्येच एक पर्याय दिला आहे. चार्जिंग करण्यासाठी कंपनीने वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला आहे. एकही होल नसलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच या Meizu Zero या स्मार्टफोनची किंमत किती असणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Meizu Zero स्पेसिफिकेशन
Meizu Zero या स्मार्टफोनमध्ये 5.99 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच 2.5 डी कर्व्ड ग्लास प्रोटेक्शन आहे. स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसरसह 630 जीपीयू देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 20 मेगापिक्सल फ्रंट तर 12 मेगापिक्सल बॅक कॅमेरा आहे. Meizu Zero मध्ये फेस अनलॉक फीचरसह ब्लूटूथ, 18 व्हॅट वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.