फेसबुकची मूळ कंपनी मेटाच्या तिसऱ्या तिमाहीतील महसुलात मोठी घट झाली आहे. मेटाच्या महसुलात चार टक्क्यांची घसरण झाली आहे. दिवसेंदिवस मेटा कंपनीचे प्रदर्शन खराब होऊ लागले असून गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
मेटाचा महसूल 29 बिलियन डॉलरवरून 27.7 बिलियन डॉलरवर आला आहे. याची घोषणा करतानाचा कंपनीने महत्वाचे बदल केले जाणार असल्याचे म्हटले आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस फेसबुकवरील सक्रिय वापरकर्त्यांची संख्या दोन टक्क्यांनी वाढून 2.96 अब्ज झाली आहे. तसेच कंपनीतील कर्मचार्यांची संख्या 87,314 पर्यंत वाढली आहे. ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा २८ टक्क्यांनी जास्त आहे.
जास्त कार्यक्षमतेने काम करण्यासाठी आम्ही संपूर्ण बोर्डमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत आहोत, असे मेटाने म्हटले आहे. कमाईतील ही घसरण मुख्यतः मेटाच्या मेटाव्हर्समध्ये मोठ्या गुंतवणुकीमुळे आहे. मेटाच्या आभासी वास्तविकता विभाग, रिअॅलिटी लॅबला या तिमाहीत $3.672 अब्जांचे नुकसान झाले आहे.
एक वर्षापूर्वी मार्ग झकरबर्गने आभासी जगाला चालना देण्यासाठी Meta ची स्थापना केली. परंतू, कंपनीच्या शेअर्सची किंमतही घसरली आहे, महसूल कमी होत आहे आणि नफाही कमी होत आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीला कोणताही लक्षणीय महसूल मिळवता आला नव्हता.