मुंबई: मायक्रोमॅक्स कंपनीने आपला भारत ५ प्रो हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारला असून यात ऑटो फेस अनलॉक हे फिचर देण्यात आले आहे. मायक्रोमॅक्सने आधीच भारत ५ हा स्मार्टफोन सादर केला आहे. याचीच पुढील आवृत्ती भारत ५ प्रो असल्याचे मानले जात आहे. या अनुषंगाने यात काही अद्ययावत फिचर्स दिले आहेत. बहुतांश उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्समध्ये ऑटो फेस अनलॉक हे फिचर दिलेले असते. आता हेच फिचर किफायतशीर दरातल्या मॉडेल्समध्येही देण्यात येत आहे. या अनुषंगाने मायक्रोमॅक्स कंपनीने सादर केलेल्या भारत ५ प्रो या ७,९९९ रूपये मूल्य असणार्या स्मार्टफोनमध्येही हे फिचर देण्यात आले आहे. हे मॉडेल ग्राहकांना पुढील आठवड्यापासून देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे. यात ओटीजी सपोर्टदेखील देण्यात आला आहे. तर यात तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती दोन दिवसांपर्यंत बॅकअप देत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. विशेष करून मल्टी-टास्कींगसाठी ही बॅटरी उपयुक्त असल्याचा या कंपनीचा दावा आहे.
मायक्रोमॅक्सच्या भारत ५ प्रो या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यात मीडियाटेकचा क्वॉड-कोअर एमटी ६७३७ प्रोसेसर असेल. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. एलईडी आणि ऑटो-फोकस या फिचर्ससह यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरा १३ व ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. याच्या जोडीला यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.