मायक्रोमॅक्स कॅनव्हास प्लेक्स टॅबलेट हे मॉडेल १ सप्टेंबरपासून देशभरातील रिटेल शॉप्समधून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या मॉडेलची खासियत म्हणजे हा टॅबलेट इरॉस नाऊ सोबत उत्पादीत करण्यात आला आहे. अर्थात याला खरेदी करणार्याला इरॉस नाऊ या सेवेची एक वर्षाची प्रिमीयम सेवा मोफत प्रदान करण्यात आली आहे. देशात सध्या स्ट्रीमिंग सेवा लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, हॉटस्टार आदींसोबत इरॉस नाऊ आदींसारख्या सेवांना ग्राहकांची पसंती मिळू लागली आहे. यातच किफायतशीर दरात इंटरनेट उपलब्ध होत असल्यामुळे याच्या लोकप्रियतेत भर पडत आहे. विशेष म्हणजे स्ट्रीमिंग सेवा फक्त स्मार्टफोनच नव्हे तर टॅबलेटवरूनदेखील मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. या पार्श्वभूमिवर, मायक्रोमॅक्स कॅनव्हास प्लेक्स टॅबलेट सोबत इरॉस नाऊची प्रदान केलेली सेवा लक्षणीय असून ती या मॉडेलची खासियत मानली जात आहे. या सेवेत अनेक बॉलिवुड तसेच भारतीय भाषांमधील चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांची खजिना आहे. यामुळे यावर अन्य कामांसह मनोरंजनाचाही आनंद घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मायक्रोमॅक्स कॅनव्हास प्लेक्स टॅबलेट या मॉडेलमध्ये ८ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. याची रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असेल. यात डीटीएस ही अतिशय दर्जेदार अशी ध्वनी प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा टॅबलेट अँड्रॉडइच्या नेमक्या कोणत्या आवृत्तीवर चालणारा असेल हे कंपनीने अद्याप नमूद केले नसले तरी ही नोगट प्रणाली असल्याचे वृत्त आहे. याशिवाय याच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह कॅमेरादेखील देण्यात आला आहे. तरूण प्रोफेशनल्स आणि विद्यार्थ्यांसाठी हा टॅबलेट खास करून लाँच करण्यात आल्याचे मानले जात आहे.