मायक्रोमॅक्स या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने आता ई-वाहनांच्या उत्पादनात उतरण्याचा निर्णय घेतला असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारपेठेवर विदेशी व त्यातही स्मार्टफोन उत्पादकांनी कब्जा केल्याचे दिसून येत आहे. या आव्हानांना तोंड देणारी एकमेव कंपनी म्हणून मायक्रोमॅक्स ख्यात आहे. यामुळे मायक्रोमॅक्स आजही बाजारपेठेत तग धरून आहे. तथापि, चीनी कंपन्यांच्या आक्रमणाचा अंदाज आधीच घेत मायक्रोमॅक्सने जाणीवपूर्वक आपल्या उत्पादनांचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यामुळे स्मार्टफोनसोबत टॅबलेट, लॅपटॉप आदींपासून ते एयर कंडिशनरपर्यंतची विविध उत्पादने मायक्रोमॅक्स कंपनीने सादर केली आहेत. यातच आता ही कंपनी ई-वाहने उत्पादीत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी लागणारा परवाना मायक्रोमॅक्स कंपनीला मिळालेला असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
मायक्रोमॅक्स कंपनी पहिल्या टप्प्यात दुचाकी आणि तीनचाकींवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे वृत्त आहे. विशेष करून अनेक शहरांमध्ये तीनचाकी ई-रिक्षा लोकप्रिय होत असून केंद्र सरकारनेही याला प्राधान्य देण्याचे धोरण अंमलात आणलेले आहे. यामुळे मायक्रोमॅक्स कंपनीदेखील यालाच प्राधान्य देणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.