मायक्रोसॉफ्टची विंडोज ऑपरेटिंग सिस्टम जवळपास सर्वच लॅपटॉप्स आणि पीसीवर वापरली जाते. गेल्यावर्षी कंपनीनं आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम Windows 11 सादर केली होती. परंतु आता कंपनीनं आपल्या ऑपरेटिंग सिस्टमचं एक व्हर्जन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्ट Windows 8.1 बंद करत आहे. विंडोज 11 किंवा विंडोज 10 वापरणाऱ्या युजर्सची संख्या वाढल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.
मायक्रोसॉफ्टनं दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2023 पासून विंडोज 8.1 वर अपडेट आणि फीचर्ससाठी सपोर्ट बंद होईल. अजूनही हे व्हर्जन वापरत असलेल्या युजर्सना पुढील महिन्यात कंपनीकडून अलर्ट पाठवला जाईल. कंपनीच्या एका अपडेट मध्ये म्हटलं गेलं आहे की, “विंडोज 8 चा सपोर्ट 12 जानेवारी 2016 ला बंद करण्यात आला आणि विंडोज 8.1 चा सपोर्ट 10 जानेवारी 2023 ला बंद करण्यात येईल.”
या तारखेनंतर Microsoft 365 अॅप्स विंडोज 8 किंवा विंडोज 8.1 वर वापरता येणार नाहीत, असं देखील सांगण्यात आला आहे. विंडोज 8.1 वापरणारे मोठ्या प्रमाणावरील लॅपटॉप असे आहेत जे विंडोज 11 ला सपोर्ट करू शकणार नाहीत. त्यांच्यासाठी कंपनी विंडोज 10 विकत घेण्याचा आणि फुल व्हर्जन इंस्टॉल करून अपग्रेड करण्याचा पर्याय कंपनीनं दिला आहे. त्यामुळे तुम्ही देखील विंडोज 8.1 ऑपरेटिंग सिस्टम वापरत असाल तर तुम्हाला लवकरच नव्या ओएसवर अपग्रेड करावं लागेल.