मायक्रोसॉफ्टची शाखा असणार्या मायक्रोसॉफ्ट स्टुडिओने मियामी स्ट्रीट हा रेसींग गेम इलेक्ट्रीक स्क्वेअर या गेमींग कंपनीच्या सहकार्याने लाँच केला आहे. हे गेम मायक्रोसॉफ्ट स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हा गेम एकाच खेळाडूला खेळता येणार आहे. यात अॅक्सलरेटर आणि ब्रेकसाठी माऊस, स्पेस बार यांच्यासह टचस्क्रीनचा वापरदेखील करता येणार आहे. या गेममध्ये अनेक वळणे असून वेगाने धावणार्या कारचे संतुलन राखण्यात गेमरची खरी परीक्षा असणार आहे. यामध्ये खेळाडूला हव्या त्या कारचे मॉडेल निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. तसेच तो अन्य स्पर्धकांसोबत रेसींग करू शकतो.
नावातच नमूद असल्यानुसार या गेममध्ये मियामीतील रस्त्यांवरून रेसींगची सुविधा देण्यात आली आहे. यात विविध पॉइंटनुसार विजेतेपद देण्यात येणार आहे. हे गेम डेस्कटॉपसह विंडोज १० या प्रणालीवर चालणारे टॅबलेट आणि स्मार्टफोनवर खेळता येईल. याच इंटरफेस अतिशय सुलभ असून यातील पातळ्यादेखील सर्वसामान्य गेमर्सला अनुकुल अशा ठेवण्यात आल्या आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याला मोफत उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे हा गेम लोकप्रिय होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.