सॅमसंग कंपनीने अलीकडेच सादर केलेल्या गॅलेक्सी एस ९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस या दोन उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्सची मायक्रोसॉफ्ट स्पेशल एडिशन सादर केली आहे. काही महिन्यांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी एस ८ या मॉडेलची मायक्रोसॉफ्ट एडिशन लाँच करण्यात आली होती. आता याच प्रकारे गॅलेक्सी एस ९ व एस ९ प्लस या मॉडेल्सची याच प्रकारातील आवृत्ती ग्राहकांना उपलब्ध केली आहे. नावातच नमूद असल्यानुसार यात मायक्रोसॉफ्ट कंपनीचे विविध टुल्स प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आलेले आहेत. यात मायक्रोसॉफ्ट लाँचरसह या कंपनीच्या एक्सेल, वर्ड, पॉवरपॉइंट, स्काईप, वन नोट, कोर्टना आदींचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे या दोन्ही मॉडेल्सच्या मायक्रोसॉफ्ट एडिशनमध्ये मूळ आवृत्तीचे सर्व फिचर्स असतील. अगदी हे स्मार्टफोन्स अँड्रॉइडच्या ओरियो आवृत्तीवर चालणारे असतील. मात्र यात मायक्रोसॉफ्टचे विविध अॅप्स देण्यात आलेली असतील.
फिचर्सचा विचार केला असता, सॅमसंग गॅलेक्सी एस९ या मॉडेलमध्ये ५.८ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी प्लस या क्षमतेचा १८:५:९ अस्पेक्ट रेशो असणारा सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. याची रॅम ४ जीबी असून यात ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी एस९ प्लस या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी प्लस या क्षमतेचा १८:५:९ अस्पेक्ट रेशो असणारा सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. याची रॅम ६ जीबी असून यात ३,५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. दोन्हींचे व्हेरियंट ६४/१२८/२५६ या इनबिल्ट स्टोअरेजच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येतील. हे स्टोअरेज ४०० जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. हे स्मार्टफोन्स वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ आहेत. या दोन्ही मॉडेल्समध्ये अतिशय उत्तम दर्जाचे कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. यातील गॅलेक्सी एस ९ या मॉडेलच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सल्सचा ड्युअल पिक्सल या प्रकारातील कॅमेरा आहे. यातील अपार्चर एफ/१.५ या क्षमतेचे आहे. हे अपार्चर डिजीटल पध्दतीने एफ/२.४ पर्यंत वाढविता येते. यात कमी उजेड असल्यास एफ/१.५ अपार्चरने तर विपुल उजेडात एफ/२.४ अपार्चरने छायाचित्रे घेता येतात. या कॅमेर्यांच्या अॅपमध्ये बिक्सबी व्हिजन हे फिचर दिले आहे. याच्या अंतर्गत काढलेल्या प्रतिमांमधील विविध फलक तसेच अन्य शब्दांच्या अनुवादाची सुविधा दिली आहे. तर या दोन्ही मॉडेल्समध्ये ऑटो-फोकस आणि एफ/१.७ अपार्चरयुक्त ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. भारतात ही नवीन आवृत्ती लवकरच सादर होऊ शकते.