डायरेक्ट टू मोबाईल पायलट प्रोजेक्ट लवकरच सुरू होऊ शकतो. माहिती आणि प्रसारण मंत्रालय लवकरच भारतातील 19 शहरांमध्ये या प्रोजेक्टचा पायलट रन सुरू करू शकते. सध्या याची प्राथमिक चर्चा सुरू असून त्यासाठी सरकारने अद्याप कोणतीही वेळ निश्चित केलेली नाही. D2M मध्ये मल्टीमीडिया कंटेंट हा डेटाशिवाय प्रसारित केला जातो आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवर थेट टीव्ही, चित्रपट इत्यादी मोफत पाहू शकता.
प्रसार भारती नेटवर्कचा केला जाणार वापर
माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले की, 19 शहरांमध्ये पायलट D2M प्रसारण प्रकल्पासाठी बोलणी सुरू झाली आहेत आणि प्रसार भारतीच्या डिजिटल टेरेस्ट्रियल ट्रान्समिशन नेटवर्कचा वापर करून हे पूर्ण केलं जाईल. म्हणजेच प्रसार भारतीच्या पायाभूत सुविधांवर थेट डायरेक्ट टू मोबाईल करून चाचणी केली जाईल. या प्रकल्पासमोर अनेक आव्हाने आहेत, ज्यात दूरसंचार कंपन्यांचा विरोध, मोबाईल फोनसाठी चिप, कंज्यूमर युसेज पॅटर्न इत्यादींचा समावेश आहे. सध्या ते कोणतीही मोबाइल कंपनी किंवा टेलिकॉम कंपनीला कोणत्याही सूचना देत नाहीत कारण सध्या हा एक पायलट प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास मोबाइल कंपन्यांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये एक चिप बसवावी लागेल ज्याद्वारे मल्टी मीडिया कंटेंट ब्रॉडकास्ट केला जाईल.
टेलिकॉम कंपन्यांचा विरोध
एक सीनियर टेलीकॉम इंडस्ट्री कंसलटेंटने मिंटला दिलेल्या माहितीनुसार, डायरेक्ट टू मोबाईलमुळे, टेलिकॉम कंपन्यांचे नुकसान होईल कारण लोक प्लॅनसह प्रदान केलेल्या सबस्क्रिप्शन बेस्ड सर्व्हिस वापरणार नाहीत आणि यामुळे कंपन्यांच्या रेवेन्यूमध्ये फरक पडेल. स्मार्टफोनमध्ये चिप बसवणे तितकं सोपं नसल्याने टेलिकॉम कंपन्यांनी तसेच चिप निर्मात्यांनी याला विरोध केला आहे.
अपूर्व चंद्रा म्हणाले की, D2M मुळे देशातील लोकांना फायदा होईल. सध्या देशात 280 मिलियन घरं आहेत, त्यापैकी फक्त 190 मिलियन घरांमध्ये टीव्ही आहेत. याचा अर्थ सुमारे 90 मिलियन घरांमध्ये अजूनही टीव्ही नाही. त्याच वेळी, भारतात स्मार्टफोनची संख्या 800 मिलियन आहे, जी 1 अब्जपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळेच D2M ब्रॉडकास्टिंग प्रचंड संधी देते आणि डेटा वापरात वाढ होऊ शकते जी या वर्षी दरमहा 43.7 एक्झाबाइट्सपर्यंत पोहोचू शकते. सुमारे 69% डेटा वापर व्हिडिओ स्ट्रीमिंगमुळे होतो. यातील 25 ते 30% जरी D2M ट्रान्समिशनवर ऑफलोड करता आले, तर ते 5G नेटवर्कवरील भार कमी करण्यासाठी मदत मिळू शकते आणि लोकांना चांगल्या सेवा मिळतील.