- खलील गिरकर मुंबई : मोबाइल ग्राहकांसाठी महत्त्वाची असलेली मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) प्रक्रिया बदलण्याचे निर्देश केंद्रीय दूरसंचार नियामक आयोगाने दिले असल्याने १० डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान एमएनपी प्रक्रिया बंद राहणार आहे. ट्रायच्या निर्देशानुसार, ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एमएनपीसाठी अर्ज केलेल्या ग्राहकांचे मोबाइल क्रमांक पोर्ट करण्यात येतील. त्यानंतर नवीन एमएनपी प्रक्रिया राबवण्यासाठी १० डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान एमएनपी प्रक्रिया बंद राहणार आहे.
नवीन प्रक्रिया लागू झाल्यानंतर १६ डिसेंबरपासून एमएनपी सुविधा ग्राहकांना मिळेल. नवीन प्रक्रियेनुसार ग्राहकांना केवळ दोन दिवसांत एमएनपी सेवा मिळेल. मोबाइल क्रमांक समान ठेवून सेवा पुरवणारी कंपनी बदलण्याबाबतचा नवीन नियम १६ डिसेंबरपासून लागू होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय) त्याबाबत माहिती दिली आहे. युनिक पोर्टिंग कोडची मुदत आता केवळ ४ दिवस राहील. जम्मू-काश्मीर, आसाम, ईशान्य भारतात मात्र ही मुदत सध्याप्रमाणे ३० दिवस राहील, असे ट्रायने स्पष्ट केले आहे.
सध्या एमएनपी प्रक्रियेसाठी साधारणत: आठवडाभराचा कालावधी लागतो, मात्र ट्रायच्या नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर हा वेळ अवघ्या ३ दिवसांवर येईल. मात्र जर ग्राहकाला दुसऱ्या सर्कलमध्ये नंबर बदलायचा असेल तर त्यासाठी ५ दिवसांचा कालावधी लागेल. एमएनपी प्रक्रिया एक दिवसात करावी, असा निर्णय सुरुवातीला घेण्यात आला होता. मात्र दूरसंचार मंत्रालयाशी केलेल्या चर्चेनंतर व त्यांच्याकडून आलेल्या सूचनेनंतर ही मुदत ३ दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्नाटकात एमएनपीचे सर्वाधिक ग्राहक
विविध मोबाइल कंपन्यांच्या सेवेला कंटाळून ग्राहक दुसºया कंपनीची सेवा स्वीकारतात. सप्टेंबर महिन्यात ५३ लाख ९० हजार ग्राहकांनी एमएनपी सेवेचा लाभ घेतला होता. ही सेवा सुरु झाल्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत तब्बल ४५ कोटी ७६ लाख ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. २५ नोव्हेंबर २०१० मध्ये या सेवेला प्रारंभ झाला होता. तर देशभरात ही सेवा २० जानेवारी २०११ पासून सुरु करण्यात आली होती. कर्नाटकात सर्वात जास्त म्हणजे ४ कोटी २० लाख ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.